नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान बाबत एक महत्वाची माहीती समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जेथे चंद्रयान-3 चा विक्रम लॅंडर उतरला होता त्या शिवशक्ती पॉईंटवर आता सकाळ सुरु झाली आहे. त्यामुळे इस्रोने चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानला पुन्हा कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आधी 22 सप्टेंबर रोजी लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानला पुन्हा कार्यरत करण्याची योजना आखली होती. परंतू नव्या योजनेनूसार आता थोडा आणखी काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडीया टूडेतील वृत्तानूसार स्पेस एप्लीकेशन सेंटरचे डायरेक्टर नीलेश देसाई यांनी म्हटले होते की याआधी 22 सप्टेंबरच्या सायंकाळी लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना पुन्हा एक्टीव्ह करण्याची योजना आखली होती. परंतू इस्रोने ट्वीटर ( एक्स ) याबाबत माहीती दिली आहे की विक्रम आणि प्रज्ञान यांना पुन्हा कार्यरत करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही सिग्नल प्राप्त झालेला नाही. आमचे संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. विक्रम लॅंडरचे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग करण्यात आले होते. या जागेचे नामकरण शिव शक्ती पॉइंट असे करण्यात आले आहे.
इस्रोने केलेले ट्वीट येथे पाहा –
Chandrayaan-3 Mission:
Efforts have been made to establish communication with the Vikram lander and Pragyan rover to ascertain their wake-up condition.As of now, no signals have been received from them.
Efforts to establish contact will continue.
— ISRO (@isro) September 22, 2023
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडींग केल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला इस्रोने विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना स्लीप मोडवर टाकले होते. 2 सप्टेंबर रोजी इस्रोने रोव्हर प्रज्ञानला स्लीप मोडवर टाकले होते. तर लॅंडर विक्रमला 4 सप्टेबर रोजी स्लीप मोडवर टाकले होते. त्यानंतर हे दोघे चंद्रावर रात्र होणार असल्याने स्लीप मोडवर होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्योदय होताच इस्रोला विक्रम आणि प्रज्ञानला पुन्हा सक्रीय करण्यात जर यश आले तर ते पुन्हा प्रयोग करु शकणार आहेत.
चंद्रयान मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी अनेक प्रयोग केले आहेत. आतापर्यंत प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर 100 मीटर अंतर पार केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वातावरणात सल्फर असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच ऑक्सिजन मुलद्रव्ये स्वरुपात असल्याचे स्पष्ट झाले होते. चंद्रावर प्लाझ्मा असल्याचे कळाले होते. आधीच्या योजनेनूसार रोव्हर चंद्रावर 300-350 मीटरचे अंतर कापणार होता. परंतू काही कारणाने ते शक्य झाले नाही. तरी त्याने त्याचे सगळे उद्देश्य पूर्ण केले आहे. चंद्राचा एक दिवस ( पृथ्वीचे 14 दिवस ) ही मोहिम काम करणार होती. त्यानंतर येथे रात्र सुरु झाल्याने उणे तापमान होणार असल्याने या उपकरणांना स्लीप मोडवर नेले होते. त्यांना जर पुन्हा जागृत करता आले तर संशोधनासाठी बोनस टाईम मिळणार आहे. त्यामुळे आता इस्रोला विक्रम आणि प्रज्ञानकडून सिग्नल मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे.