राजस्थानच्या जोधपूरमधून (jodhpur clash) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात (communal tension) सोमवारी रात्री उशिरा वाद झाला. या वादानंतर दगडफेकीची घटना घडली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटांकडून जालोरी गेट परिसरामध्ये जोरदार दगडफेक झाली. दरम्यान त्यानंतर आज पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले रमजान ईदच्या नमाजानंतर पुन्हा एकदा जालोरी गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली झाली. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांवर (jodhpur police) दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रू धुराचा वापर करण्यात आला. या वादानंतर त्यातील एका गटाने स्वातंत्र सैनिकाच्या पुतळ्या जवळ लावण्यात आलेला झेंडा हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित झेडा लावण्यावरूनच सोमवारी रात्री दोन गटात वाद झाला होता. या वादानंतर दगडफेक झाली. ऐन ईदच्या पूर्वसंधेला तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने घटनास्थळी सोमवारी रात्रीच पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. सीआरपीएफचे जवान देखील तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आज पुन्हा एकदा हेच दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
याबाबत माहिती देताना पोलीस कमिश्नर नवज्योती गोगाई यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिली. गोगाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या दगडफेकीच्या घटनेमध्ये काही पोलीस कर्मचारी हे कीरकोळ जखमी झाले आहेत. खबरदारी म्हणून शहरातील इंटरनेट सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे.