Election Results : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला आहे. या निवडणुकीत चन्नी यांनी चमकौर साहिब (Chamkaur Sahib) आणि भदौर (Bhadaur) या जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना आपली खुर्ची वाचवता आली नाही. दरम्यान, ज्या पक्षाने पंजाबमध्ये बहुमत मिळवले, त्या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ आता चर्चेत आला आहे. ज्या दोन जागांवर चन्नी यांनी निवडणूक लढवली, त्या जागांवर त्यांचा पराभव होणार, असे केजरीवाल म्हणाले होते. निवडणुकीआधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हा दावा केला होता. आता तो खरा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे छातीठोकपणे सांगत लिहूनही दिले होते. तो व्हिडिओ आता समोर आला आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. उत्तर प्रदेशसह गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला निर्णायक आघाडी मिळालीय. तर पंजाबमध्ये आपने मुसंडी मारली आहे. दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. चमकौर साहिबमधून चरणजीत सिंग चन्नी यांचा आम आदमी पार्टीचे उमेदवार चरणजीत सिंग यांनी पराभव केला आहे. या जागेवर चरणजीत सिंग चन्नी यांना सुमारे पाच हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. तर भदौरमधून आम आदमी पार्टीचे उमेदवार लभ सिंग यांनी चरणजीत सिंह चन्नी यांचा जवळपास 34 हजार मतांनी पराभव केला आहे.
या दोन्ही जागांवर चन्नी पराभूत होणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. आता त्यांचा हा दावा पूर्णत: खरा होताना दिसत आहे. चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे 16वे मुख्यमंत्री होते. पंजाबचे पहिले एससी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. चन्नी हे राहुल गांधीचे निकटवर्तीय समजले जातात. म्हणून जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला, त्यानंतर चन्नी यांना मुख्ममंत्री बनवण्यात आले होते. (Video courtesy – Aajtak)