मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : भारत आणि चीन सीमेवर चीनने आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनच्या अहवालात याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चीनने भारताला लागून असलेल्या LAC म्हणजे प्रत्यक्ष सीमा रेषेवर साल 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले असून आणि सैनिकांना तैनात केल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताशी तणाव वाढल्यानंतर चीनने डोकलाम जवळ अनेक नवीन रस्ते, बंकर बांधले. तसेच पँगॉग सरोवरावर आणखी एक पुल आणि एलएसीवर दुहेरी उद्देशांसाठीचा विमानतळ आणि अनेक हॅलिपॅड बांधल्याचे अहवालात म्हटले आहे.
भारत आणि चीन दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून पूर्व लडाखच्या अनेक क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर राजकीय आणि सैनिक स्तरावर बोलणी आणि बैठका झाल्यानंतर अनेक क्षेत्रातून सैन्य माघारी करण्यात आली होती. या दरम्यान पेंटागॉनने ‘मिलिट्री एंड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्वोल्विंग द पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ नावाने हा अहवाल जारी केला आहे.
पेंटागॉनच्या या अहवालात म्हटले आहे की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( एलएसी ) सीमा रेषेबद्दल दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या दाव्यांमुळे आणि बांधकामामुळे अनेकदा संघर्ष झालेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सैनिकांचा पहारा आहे. चीन 2022 पासून एलएसीवर सैनिकी पायाभूत सुविधा उभारण्याचा सपाटा लावल्याचे या अहवालात नमूद केले आहे. चीनने डोकलामजवळ भूमिगत भांडार सुविधा, एलएसीच्या सर्व तिन्ही क्षेत्रात नवे रस्ते, शेजारील भूतानमध्ये नवीन गावे, पॅंगॉग सरोवरावर नवा पुल, सेंटर सेक्टरजवळ दुहेरी सुविधेचा विमानतळ उभारला आहे.
15 जून 2020 रोजी चीन सैनिक आणि भारतीय सुरक्षा दलात मोठी झडप झाली होती. हा गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठा संघर्ष होता. त्यानंतर एलएसीवर वेस्टर्न थिएटर कमांडने पिपल्स लिबरेशन आर्मीची ( पीएलए )मोठ्या प्रमाणात तैनाती केली आहे. पेंटागॉनने चीनकडे 500 अण्वस्र असून चीन त्यात दुप्पट वाढ करण्याच्या बेतात असल्याचेही म्हटले आहे.