श्रीनगर : जम्मू काश्मीर खोऱ्या (Valley)त आज पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. बांदीपोरा येथील साळिंदर जंगल परिसरात ही चकमक उडाली. जंगल परिसरात आणखी दहशतवादी (Terrorist) लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांकडून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरु ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे. त्यांची कट-कारस्थाने उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या असून दहशतवादविरोधी विशेष कारवाईची मोहीम उघडली आहे.
बांदीपोरा येथील साळिंदर जंगल परिसरात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी या कारवाईबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक रायफल, तीन मॅगझिन जप्त करण्यात आल्या आहेत. इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. उसंगम मलमाचे ऑपरेशन सुरु आहे, असेही आयजीपी विजय कुमार यांनी स्पष्ट केले.
बांदीपोरामध्ये घुसखोरीच्या वृत्तानंतर सर्व सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अधिकार्यांच्या मते, कोटा सातरी जंगल आणि गुंडपोरा जंगल, यातू, क्विलमुकम यासारख्या भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू करण्यात आले आहेत. बांदीपोरा पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे शोध मोहीम राबवून अनेक भागात तपासणी सुरू ठेवली आहे. राजोरीमध्ये चार दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेवर एका घुसखोराला ठार मारण्यात आले होते. 7 मे (शनिवार) रोजी नियंत्रण रेषेवरील नौशेरा भागातील लाम सेक्टरमध्ये लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह जप्त करण्यासोबतच त्याच्याकडून शस्त्रे, अन्न आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर अशरफ मौलवीचा समावेश होता. दक्षिण कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बटकूट जंगलात दहशतवाद्यांशी चकमक उडाली होती. त्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते.