जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये 100 युनिटपर्यंत आता सर्वांचे वीज बिल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत सांगितले आहे की 100 युनिट मोफत वीज, निश्चित शुल्क, इंधन अधिभार आणि पुढील 100 युनिटवरील इतर शुल्क माफ केले जाईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. गेहलोत यांनी सांगितले आहे की, महागाई निवारण शिबिरांमध्ये नागरिकांबरोबर संवाद साधल्यानंतर, त्यांना राजस्थानमध्ये वीज बिलांमध्ये देण्यात येणाऱ्या सूट याबद्दल माहिती देण्यात आली.
यावर कारवाई करत गेहलोत सरकारने सर्वांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, या निर्णयासाठी जनतेने मे महिन्यातील वीज बिलामध्ये इंधन अधिभाराबाबत सल्लाही दिला होता आणि त्या आधारावर पुढील 100 युनिट वीज देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबतचे ट्विट करताना गेहलोत यांनी सांगितले की, राजस्थानमधील नागरिकांना प्रत्येक महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. त्यांना पूर्वीप्रमाणे सुरुवातीच्या 100 युनिट विजेच्या वापरासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
तसेच अशोक गेहलोत यांनी सांगितले की, हा फायदा केवळ कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी नाही. तर 100 युनिटपेक्षा जास्त वीज खर्च करणाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच कितीही वीज वापरली तरी सुरुवातीचे १०० युनिट वीज सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी कोणतेही वीज शुल्कही भरावे लागणार नाही.
मोफत वीज देण्याच्या घोषणेसोबतच गेहलोत यांनी आणखी एक घोषणा केली आहे की, मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन दरमहा 200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना निश्चित शुल्क, इंधन अधिभार आणि इतर शुल्क माफ केले जाणार आहे. हे शुल्क राज्य सरकार भरणार आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रात्री 10 वाजता ट्विट करून जनतेला दिलासा देण्यासाठी काही वेळाने मोठी घोषणा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी राजस्थानमध्ये मोफत वीज देण्याचीही घोषणा केली.
ही योजना आगामी विधानसभा निवडणूक असल्याने झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खरं तर काँग्रेस पक्षाने कर्नाटकातही मोफत वीज देण्याची घोषणा केली होती आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला असल्याचे सांगितले गेले आहे.
कर्नाटकात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला असून राजस्थानमध्ये येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे या परिस्थितीत मोफत विजेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर आम आदमी पक्षही यावेळी राजस्थान विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या मानसिकतेत आहे. गेहलोत यांच्या या निर्णयामुळे आम आदमी पक्षाच्या फुकटच्या राजकारणाला नक्कीच धक्का बसणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.