नवी दिल्लीः पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान (Panjab CM Bhagwant Man) यांनी एक दावा केला आहे की, आता संपूर्ण देशात बदलाचे वारे वाहू लागत आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि हरियाणातील नागरिकही या बदलाचा एक भाग बनण्यासाठी उत्सुक आहेत. आदमपूर (हरियाणा) विधानसभा मतदारसंघात आपचे उमेदवार सतींदर सिंग यांच्या समर्थनार्थ जोरात प्रचार करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, पंजाबच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे.
त्यामुळे आता त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, त्यामुळेच देशातील लोकंही आता आमच्याकडे पर्याय म्हणून बघत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आता हरियाणाची वेळ आली असून हरियाणातील या बदलाचा आधार आदमपूर विधानसभा मतदारसंघात बदल दिसून येणारआहे.
भगवंत मान म्हणाले की, हरियाणातील जनतेला चांगल्या आरोग्य आणि शिक्षण सुविधा आणि उत्तम प्रशासन पाहिजे असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा जाऊ देणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
भगवंत मान म्हणाले की, दिल्लीत सुरू करण्यात आलेले मोहल्ला क्लिनिकचे क्रांतिकारी पाऊल आता पंजाबमध्ये आम आदमी क्लिनिकच्या रूपाने यशाचे नवे परिमाण निर्माण करत आहे. दररोज शेकडो लोक या क्लिनिकच्या माध्यमातून मोफत उपचारांचा फायदा घेत आहे.
भगवंत मान म्हणाले की, दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलला जगभरात मान्यता मिळाली असून आता पंजाबमध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात राजकीय परिवर्तनाची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच लोकं आता भाजपला कंटाळली आहेत. त्यांना भाजपची सत्ता नको असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी भगवंत मान यांनी सांगितले की, देशाची वाटचाल सध्या राजकीय परिवर्तनाकडे सुरू आहे. त्या परिवर्तनासाठी काँग्रेस आणि भाजपच्या पलीकडे जाऊन जनता अधिक राजकीय पर्याय शोधत आहे.
या राजकीय बदलाचा पाया गुजरात, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यातून घातला जाणार आहे. निवडणुकीतील विजयानंतर या राज्यांतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल करून जनतेला दिलासा दिला जाईल असा विश्वासही त्यांनी दिला आहे.