उत्तरकाशी | 29 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडाच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यातील भूस्खलनाने अडकलेल्या 41 कामगारांची काल अखेर 17 व्या दिवशी सुखरुप सुटका झाली. या बचाव मोहिमेत परदेशी तज्ज्ञांपासून आधुनिक मशिनचा वापर करण्यात आला. परंतू त्यास खासे यश आले नाही. अखेर 27 नोव्हेंबरला दाखल झालेल्या रॅट मायनर्स यांनी केवळ दीड दिवसात मॅन्युअली खोदकाम करीत या मजूर कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि देशभर आनंद व्यक्त केला गेला. मजूरांना बाहेर काढण्यासाठी उत्तरप्रदेशातील झांशी येथून आलेल्या 12 रॅट मायनर्सनी 36 तासांचा अवधी मागितला होता. परंतू त्यांनी 27 तासांतच काम तमाम करीत मजूरांना यशस्वी बाहेर काढत त्यांना मोकळा श्वास दिला.
उत्तरकाशीतील चारधाम योजनेचा रस्ता तयार करताना 12 नोव्हेंबरच्या सकाळी 5.30 वा. सिलक्यारा बोगद्यात झालेल्या भूस्खलनाने 41 मजूर ऐन दिवाळीत अडकले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी आधुनिक मशिन वारंवार बंद पडू लागल्याने बचाव मोहीम रेंगाळली. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी उत्तरप्रदेशातील झाशीतून 12 रॅट मायनर्सती टीम आणण्यात आली. परंतू या मजूरांना वाचविण्यात आणखी हिरो होता तो म्हणजे सहा इंचाचा पाईप ! या पाईपमुळे मजूरांना 20 नोव्हेंबर पासून अन्न पाठविता येणे शक्य झाले तसेच त्यांच्याशी संवाद साधता येऊ लागला. त्यामुळे मजूरांचे मानसिक बळ वाढविणे शक्य झाले. तसेच आतील मजूरांना गब्बर सिंह आणि शबा अहमद या दोघांनी नेतृत्वाची भूमिका घेत त्यांचे मनोबल वाढविले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41 मजूरांशी 15 मिनिटे फोनवरून चर्चा केली. त्यावेळी मोदी यांनी गब्बर आणि अहमद या दोघांचे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले. मोदी यांनी म्हटले तुमच्या दोघा गावकऱ्यांनी केलेल्या नेतृत्वावर एखाद्या युनिव्हर्सिटी अभ्यास करायला हवा. यावेळी या दोघांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की मजूर गाणी ऐकत, योगासने करीत, आणि बोगद्यात सैरसपाटा मारून स्वत:ला बिझी ठेवत होते.
12 नोव्हेंबरच्या सकाळी 5.30 वा. जेव्हा सिलक्यारा बोगद्यात भूस्खलन झाल्याची माहीती मिळाली त्यानंतर हवाई मार्गाने ऑगर मशिन घटनास्थळी आणण्यात आले आहे. त्यानंतर ड्रीलिंगची प्रक्रीया सुरु झाली. 20 नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती कठीण होती. कारण केवळ चार इंचाचा पाईपचा आधार होता. त्यामुळे आत केवळ सुका मेवा पाठविता येत होता. परंतू 20 नोव्हेंबरनंतर सहा इंचाचा पाईप मजूरांपर्यंत पोहचला. त्यानंतर आत बीएसएनएलची लाईन टाकणे शक्य झाले. मजूरांचा व्हिडीओ काढण्यासाठी आत कॅमेरा पाठविला. मजूरांना उत्साहीत ठेवण्यासाठी औषधे आणि फोन चार्जर तसेच ठोस अन्न पाठविणे सहा इंचाच्या पाईपमुळे शक्य झाले. फोनवरून संपर्क करुन नातेवाईकांशी संवाद साधता आले.
रॅट मायनर्सनी 36 तासांचा अवधी मागितला होता, परंतू 27 तासांत त्यांनी मोहीम फत्ते केली. 41 मजूरांना बाहेर काढण्यासाठी काल सायंकाळी एक वेल्डेड पाईप टाकण्यात आला. त्यानंतर एनडीआरएफचे लोक पाईपमधून आत गेले आणि एका-एका मजूराला सुखरुप बाहेर काढले. सायंकाळी 7.50 वाजता सर्वात कमी वयाचा मजूर बाहेर आल्यानंतर 45 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण झाली आणि रॅट मायनर्सनी खरोखरच चमत्कार केला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रॅट मायनर्सना प्रत्येकी 50 हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे.