नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shivsena) बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दिल्लीला (New Delhi) येण्याची दोन कारणे होती, एक तर खासदारांच्या समर्थनाचे पत्र आणि दुसरे म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी वकिलांची भेट असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले, असेही ते म्हणाले.
मी आमची भूमिका वारंवार सांगितली आहे. आमच्या भूमिकेचे समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेच आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनेही त्याचे समर्थन मोठ्या प्रमाणावर केले आहे. निवडणूकपूर्व आमची युती होती. महिन्याभरात आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवे होते, ते आता केले आहे. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इंधनापासून शेतीपर्यंतचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे कामही सुरू केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दिल्लीत येण्याचे ओबीसी आरक्षण हेदेखील एक कारण आहे. याप्रकरणी उद्या सुनावणी आहे. त्यासाठी आलो आहे. वकिलांची भेट घेतली. दरम्यान, बारा खासदारांचे मनापासून स्वागत करतो. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले. केंद्र सरकारचे पाठबळ मिळत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही, असे केंद्राने सांगितले. केंद्र आणि राज्य एकत्र येऊन काम करतो तेव्हा त्या राज्याचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना धन्यावाद देतो, असेही शिंदे म्हणाले.