गुवाहाटी: काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचं केंद्र ठरलेलं आसामची राजधानी गुवाहाटी शहर… गुवाहाटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला आलंय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे उद्या शनिवारी संध्याकाळी जात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटलेले 12 खासदारही उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या आपल्या आमदार आणि खासदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. उद्या संध्याकाळी मुंबईतून विशेष विमानाने सर्वजण गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार तब्बल तीन महिन्यानंतर गुवाहाटीला जाणार असल्याने टीव्ही9 मराठीची टीमही गुवाहाटीला पोहोचली असून या टीमने शिंदे गटाच्या या दौऱ्याचा आढावा घेतला आहे.
उद्या शनिवारी शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि मंत्री विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच गुवाहाटी दौरा आहे. तर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरचा 12 खासदारांचा हा पहिलाच दौरा आहे.
उद्या संध्याकाळी सर्व आमदार, खासदार आणि मंत्री हे सर्वजण रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरणार आहेत. या हॉटेलातील 100 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. गेल्यावेळीही याच हॉटेलात शिंदे गट उतरला होता. त्यामुळे पुन्हा याच हॉटेलात सर्व आमदार आणि खासदार उतरणार आहेत.
या हॉटेलपासून कामाख्या देवीचं मंदिर 20 मिनिटावर आहे. रविवारी सकाळी सर्वजण या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन शिंदे गट देवीचं दर्शन घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मंदिराभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदारांनी आजपासूनच गुवाहाटी दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी गुवाहाटीला जाण्याची तयारी सुरू केल्याचं सांगितलं. मला मुख्यमंत्र्यांकडून दौऱ्याचं निमंत्रण आलं आहे.
त्यामुळे उद्या आम्ही गुवाहीटकडे निघू. 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी परत मुंबईला येऊ. सर्वच्या सर्व 50 आमदार बऱ्याच महिन्यानंतर एकत्र भेटणार आहोत. त्यानिमित्ताने आमचं गेट टुगेदर होणार आहे, असं किशोर जोरगेवार यांनी सांगितलं.
प्रत्येकाला देवीच्या आशीर्वादाची गरज असते. आम्हीही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. मी वारंवार कामाख्या देवीला जात असतो, असंही त्यांनी सांगितलं.