गुवाहाटी: कामाख्या देवीली रेड्यांचा बळी देतात. हे आमदार गुवाहाटीला कशाला चाललेत? अशी खोचक टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्याचा मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी विमानतळावर पाऊल ठेवताच समाचार घेतला आहे. आम्ही देवीचे भक्त आहोत. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. याची परिचिती सर्वांना आलीच असेल. त्यामुळे विरोधकांनी जपून बोलावं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव न घेता लगावला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या निमंत्रणामुळेच आम्ही गुवाहाटीला आल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सहकारी आमदारांसह आज गुवाहाटीला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आसाम सरकारने रेड कार्पेट अंथरले होते. त्यानंतर शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
आसामचा पारंपारिक गमछा आणि आसामी टोपी देऊन या सर्वांचं यावेळी स्वागत करण्यात आलं. आसाम सरकारचे तीन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला.
आसाम सरकारने आमचं स्वागत केलं. याचा आनंद आहे. समाधान आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याची संधी मिळाली. आजच आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. सरकार स्थापन झालं. सर्व सामान्य लोकांच्या मनातील सरकार स्थापन झालं. विरोधकांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.
आम्ही श्रद्धेने आणि भक्तीभावाने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. आम्ही दर्शनाला आलोय. सर्वांच्या मनात दर्शनाला यायचं होतं. पूर्वी आलो होतो. तेव्हा धावपळ झाली होती. त्यामुळे पुन्हा दर्शनाला जाण्याची सर्वांची इच्छा होती. त्यानसुार आज निवांत आलो, असंही त्यांनी सांगितलं.
विरोधकांना टीका करायचा अधिकार आहे. त्यांना काम उरलं नाही. आम्ही काम करणारे लोकं आहोत. त्यांना टीका करू द्या आम्ही काम करत आहोत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच काही आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत. त्यामुळे ते या दौऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी माझ्याकडे परवानगी घेतली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.