गुवाहाटी: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बुलढाण्यातील सभेमधून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. खोके तर ही छोटीमोठी गोष्ट आहे. फ्रिजच काय कंटनेर भरून भरून खोके कुणाकडे गेले? हे खोके कुणी पचवले? त्याचा शोध मी घेत आहे. हे सर्व मी एक दिवस बाहेर काढणार आहे, असा गर्भित इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुवाहाटीत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
मी जे करतो ते खुले आम करतो. लपूनछपून करत नाही. काही लोक लपूनछपून करतात. परंतु, लपूनछपून केलेली कामे उजेडात येतात. ती माहीत पडतात. काल दीपक केसरकर यांनी एक विधान केलंय. ते बोध घेण्यासारखं आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:मध्ये झाकून पाहा. तुमचं बोलणं कुणाला लागू पडतं ते कळून जाईल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
फ्रिजमध्ये भरून खोके कुठे गेले? त्याचा मी शोध घेतो आणि नंतर बोलतो. सर्व दुनियेला माहीत आहे. महाराष्ट्राला माहीत आहे. ते बोलतात ते छोटेमोठे खोके आहेत. मोठमोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का?
मोठ मोठे खोके, फ्रिजभरून खोके, कंटेनर एवढे खोके कुणाकडे जाऊ शकतात? हे खोके कोण पचवू शकतं? हे महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस ते महाराष्ट्राच्या समोर येईल. केसरकरांनी त्याचं सूचक विधान केलं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका नैराश्यातून आलेली असल्याचं ते म्हणाले. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यांची मानसिकता ढळलेली आहे. त्यांचं मोरल तुटलेलं आहे. नैराश्यातून त्यांच्याकडून असं वक्तव्य होतंय. मला वाटत होतं की त्यांना नैराश्य यायला खूप वेळ लागेल. पण ते अगोदरच आलं आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
या पूर्वी महाराष्ट्रात निगेटिव्हिटी होती. नैराश्याचं वातावरण होतं. नवीन सरकार बनवल्याने आम्ही ते वातावरण बदललं. सकारात्मक दृश्य, पॉझिटिव्हीटी क्रिएट झाली. सरकारबद्दल पब्लिक पर्सेप्शन चांगलं आहे.
त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेलं नाहीत. त्यामुळे असे वक्तव्य त्यांच्याकडून झालं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.