Nitish Kumar | सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar)नाराज आणि तेवढेच आक्रमक झाले आहेत. मणिपुरमधील जनता दल युनायटेडच्या (JDU) पाच आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जेडीयुचा तिळपापड झाला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते सध्या भाजपवर तुटून पडले आहेत. खास करुन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा (BJP) खरपूस समाचार घेतला आहे. भाजपने पैशांच्या जोरावर आमदार फोडल्याचा आरोप त्यांनी केला. शनिवारी जेडीयूची राज्या कार्यकारणीची बैठक पाटण्यात झाली. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवली तर भाजप अवघ्या 50 जागांवर विजयी होईल, असे धक्कादायक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. तसेच विरोधकांची मोट बांधण्याचे कामही आपण हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता ही त्यांचे भाकीत आहे की अतिआत्मविश्वास हे अवघ्या दोन वर्षात समोर येईल.
नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या गोटातूनही लागलीच पलटवार करण्यात आला. बिहार भाजपचे (BJP Bihar) अध्यक्ष संजय जायसवाल यांनी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांच्यावर जोरदार शाद्बिक हल्ला चढवला. जर पैशांच्या जोरावर विधायक फोडता येत असतील तर ,राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अर्धा डझन आमदार फोडण्यासाठी जेडीयूने किती कोटी रुपये खर्च केले असा सवाल त्यांनी विचारला. ज्यावेळी आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्ष फोडले त्यावेळी जेडीयूची नैतिकता कुठे गेली होती, असा खोचक सवाल ही त्यांनी विचारला.
भाजपच्या या आरोपांना तात्काळ जेडीयूने उत्तर दिले आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन ऊर्फ ललनसिंह यांनी, जेडीयूने इतर राजकीय पक्ष फोडल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ललन सिंह यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत, यांनी हा इतर राजकीय फोडण्यात जेडीयूची भूमिका असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. पण त्या पक्षातील काही आमदारांना जेडीयूत प्रवेश करायचा होता. मग ते काँग्रेसचे असो वा आरजेडीचे, त्यांना पक्षात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. भाजपने कितीही जोर लावला तरी त्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत, असा टोलाही ललन सिंह यांनी भाजपला लगावला. भाजपने कितीही डावपेच टाकू द्या, त्यांना यश येणार नसल्याचा दावा ललन सिंह यांनी केला.