नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाची देशभरात जोरदार चर्चा आहे. देशाच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अनेकवेळा पुतण्याच्या चुकांना पदरात घेणाऱ्या पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांची देशात चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. अशातच कर्नाटक राज्यामध्ये अजित पवार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्र्यांनी केल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशीच परिस्थिती आता कर्नाटकमध्ये व्हायला फार वेळ लागणार नाही, काँग्रेसचे सरकार वर्षभरात पडेल. अजित पवार कोण असतील हे मी इथे सांगणार नाही, पण ते लवकरच होणार असल्याचं दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होताना सिद्धरामय्या यांच्यासोबतच डीके शिवकुमार यांच्या नावाचीही मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चर्चा होती. डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र काँग्रेस हायकमांडने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. कुमारस्वामी यांनी यावेळी बोलताना सर्वात गंभीर आरोप केला.
राज्य सरकारमध्ये बदली करून देण्यासाठी एक टोळी सक्रिय झाली आहे. पैसे घेऊन बदली करण्याचं काम करत आहे. त्यामुळे सर्व विभागांमध्ये भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला होता. परिवहन आणि महसूल विभागांनंतर आता व्यापारी कर विभागांमध्येही या टोळीने पैसे घेत बदल्या केल्याचे अनेक प्रकार केले आहेत. राज्यातील प्रत्येक पदासाठी पैसे खात असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडांमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारे आता कर्नाटकमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यत आहे. मात्र यांचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.