नवी दिल्ली | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असताना कॉंग्रेसने गुरुवारी पक्षाची बॅंक खाती गोठवल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. एखाद्या पक्षाचे ऐन लोकसभा निवडणूकीत खाती गोठविण्याचा प्रकार हा खतरनाक खेळ असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. भाजपाने स्वत:साठी हजारो कोटी जमा केलेत आणि आमची खाती मात्र गोठवून टाकल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.
भारताला अख्ख्या जगात लोकशाही, मुल्ये आणि आदर्शासाठी ओळखले जाते. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणूका होणे गरजेचे आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी परंतू आमच्या पक्षांची खाती गोठविल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे खरगे यांनी सांगितले. आता भारताची जी प्रतिमा जगात होती. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही समानपातळीवर निवडणूका लढवू नये यासाठी आमची खाती फ्रिज केली आहेत. एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूकच लढविण्यात बाधा निर्माण करणे हा खतरनाक खेळ खेळला जात आहे. सर्वत्र सत्ताधारी पक्षाच्या जाहीरातींचा पूर आहे. यातही यांचीच मोनोपॉली असल्याची टीका खरगे यांनी केली आहे.
खरगे यांच्या मुद्द्यालाच पकडत सोनिया गांधी यांनी हा मुद्दा केवळ कॉंग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण लोकशाहीसाठीच धोकादायक आहे. जनतेने आम्हाला दिलेला पैसा लुटला जात आहे. हे लोकशाहीला धरुन नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. यावेळी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने आमची खाती फ्रिज करून त्यातून जबरदस्ती 115 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स सरकारला ट्रान्सफर केला आहे. ही कुठली लोकशाही आहे. जर जनतेने आम्हाला साथ दिली नाही तर लोकशाही राहणार नाही आणि आम्ही तुम्ही राहणार नसल्याचे माकन यांनी म्हटले आहे.
आर्थिक वर्षे 2017-18 साठी एक नोटीसीसाठी चार बॅंकातील आमच्या 11 बॅंक खात्यातील 210 कोटी रुपयांच्या निधीवर अंकुश बसविला गेला. 199 कोटी रुपयांच्या एकूण निधीतील केवळ 14.49 लाख रोकड ( आमच्या खासदारांनी पक्षाला दान केलेला निधी ) सापडली होती. ही रोख रक्कम एकूण दानापैकी केवळ 0.07 टक्के आहे. आणि शिक्षा 106 टक्के रकमेला झाल्याचे माकन यांनी म्हटले आहे.
बॅंक खाती दर गोठवली तर आम्ही निवडणूक कशी लढवायची. तुमची जर खाती बंद केली, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणार कसे. ना आम्ही प्रचार करू शकत. ना प्रवास करू शकत. ना नेत्यांना खर्चासाठी पैसे देऊ शकत अशी व्यथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. निवडणूकीच्या दोन महिने आधी अशी कारवाई करणे म्हणजे ते कॉंग्रेसला निवडणूक लढवू देऊ इच्छित नाहीत. हा कॉंग्रेस सोबतचा अन्याय आहे. या निवडणूक आयोग देखील गप्प आहे. आम्हाला 20 टक्के जनता मतदान करते. परंतू सर्व संविधानिक यंत्रणा या अन्यायावर शांत बसल्याचे राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटले आहे.
सात वर्षांपूर्वी 14 लाखाचे प्रकरण होते. आज 200 कोटी वसुल करीत आहेत. नियमानूसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड होतो. सीताराम केसरी यांच्या काळातील नोटीसी आता दिल्या जात आहेत. देशात लोकशाही आहे. हे सर्वात मोठे असत्य आहे. आमची खाती फ्रिज केली जात नसून लोकशाहीच फ्रिज केली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.