नवी दिल्ली : राज्यसभेचा कार्यकाल संपल्यानंतर आपल्या निरोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद भावूक झाले. ‘मी त्या नशीबवान लोकांमध्ये आहे, जे पाकिस्तानात कधी गेले नाहीत. पण जेव्हा मला कळतं की पाकिस्तानात काय अवस्था आहे, तेव्हा मला अभिमान वाटतो की आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. जगात जर कुठल्या मुस्लिम नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे तर तो भारतीय मुस्लिमांनी मानायला हवा’, अशा शब्दात आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.(Congress leader Ghulam Nabi Azad was emotional in Rajyasabha)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी आझाद यांच्या कार्याची स्तुती करताना, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी सर्वांचे आभार मानताना आपल्या राजकीय जिवनातील काही महत्वपूर्ण अनुभव आणि किस्से सदनात मांडले.
आम्ही देशभक्ती महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि मौलाना आझाद यांना वाचून शिकली आहे, असं आझाद म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचेही आभार व्यक्त केले, कारण त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचल्याचं आझाद यांनी सांगितलं. त्याचबरोबर आझाद यांनी सांगितलं की, आधी काश्मीरची अवस्था काय होती आणि आता त्यात किती बदल झाला आहे.
गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कॉलेजच्या जीवनातील एक अनुभव संसदेत सांगितला. ‘मी काश्मीरच्या सर्वात मोठ्या एसपी कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा तिथे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन, असे दोन्ही दिवस साजरे केले जात. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असायची. पण मी आणि माझे काही मित्र भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचो. त्यानंतर आम्ही 8 दिवस कॉलेजला जात नसू. कारण, तिथे मार खावा लागायचा. तेव्हापासून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत’, असं आझाद यांनी सांगितलं.
गेल्या 30-35 वर्षाचा इतिहास पाहिला तर अफगाणिस्तानपासून इराकपर्यंत अनेक मुस्लिम देश एकमेकांविरुद्ध लढून संपण्याच्या मार्गावर आहेत. तिथे कुणी हिंदू किंवा ईसाई नाही. ते लोक आपसांतच लढत आहेत. पाकिस्तानी समाजात ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, देव करो त्या भारतीय मुस्लिमांमध्ये कधीही यायला नको, अशी आशाही आझाद यांनी व्यक्त केली.
संसदेत पंतप्रधान मोदी यांच्याशी अनेकदा शाब्दिक वाद झाले. पण त्यांनी कधीही तो वाद वैयक्तिकपणे घेतला नाही. आपल्याला सर्वांना मिळून देशाला पुढे घेऊन जायचे आहेत. संसदेत भाषण करताना गुलाम नबी आझाद भावूक झाले. त्यावेळी त्यांनी एक शेरही सांगितला,
गुजर गया वो जो छोटा सा ये फसाना था
फूल थे चमन था आशियाना था
न पूछ उजड़े नशेमन की दास्तां
चार दिन का ही था, मगर था तो आशियाना ही था..
काश्मीरच्या सध्यस्थितीवर बोलताना आझाद म्हणाले,
दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है
लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है
संबंधित बातम्या :
नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?
गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा
Congress leader Ghulam Nabi Azad was emotional in Rajyasabha