Motilal Vora | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन, ‘सच्चा कार्यकर्ता गमावला’- राहुल गांधी

| Updated on: Dec 21, 2020 | 4:28 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे सोमवारी (21 डिसेंबर) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. (Motilal vora passed away)

Motilal Vora | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन, सच्चा कार्यकर्ता गमावला- राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी (21 डिसेंबर) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना मूत्रपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, वृद्धापकाळ आणि मूत्रपिंडाचा त्रास यामुळे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. रविवारी (20 डिसेंबर) व्होरा यांनी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्गदेखील झाला होता. मात्र, योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात कोली होती.

मोतीलाल व्होरा कोण होते ?

मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठे नाव आहे. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोतीलाल व्होरा यांचा मोठा वाटा राहीलेला आहे. काही वर्तमानपत्रांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. 1972 मधील विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी मध्य प्रदेशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या मंत्रिमंडळात 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. लगेच दोन वर्षांनी म्हणजेच 1985 साली त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केंद्रीय राजकारणाकडे वळवला आणि 1998 च्या लोकसभेमध्ये राजनांदगाव या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली.

मोतीलाल व्होरा काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते -राहुल गांधी

मोतीलाल व्होरा यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. व्होरा यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक सच्चा कार्यकर्ता, काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणारा नेता गमावला, असे म्हणत राहुल गांधी यांनी व्होरा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

संबंधित बातम्या :

West Bengal : दिलीप घोष यांच्या सभेपूर्वी भाजपच्या दोन गटांत हाणामारी, टीएमसी नेत्यांच्या प्रवेशावर कार्यकर्ते नाराज

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, सरकार सतर्क, घाबरु नका

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय