नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Gangaram Hospital) भरती करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तब्येत गुरुवारपासून बिघडली होती. गुरुवारीच त्यांना ताप आला होता. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर आणि नर्सेसच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आलंय. तसेच सोनिया गांधी यांच्या विविध वैद्यकीय चाचण्याही केल्या जात आहेत.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. कालच त्यांना इथे दाखल करण्यात आलं होतं. आज हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं. सोनिया गांधी यांच्यावर चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटचे सीनियर कन्सल्टंट डॉ. अरुप बासु यांच्या देखरेखीखाी उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती ठिक नाहीये. तर राहुल गांधी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमदील केम्ब्रिज विद्यापीठात ते लेक्चर देण्यासाठी गेले आहेत. राहुल गांधी यांनी केम्ब्रिजमधील विद्यार्थ्यांसमोर केलेलं भाषण सध्या सोशल मीडियायवर व्हायरल झालंय. भारतातील लोकशाहीविरोधी वातावरणावर त्यांनी सणकून टीका केली. तसेच माझ्या फोनमध्येही पेगासस हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर होते, असा दावा त्यांनी केला. भाजपने सर्व यंत्रणा, माध्यमांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. छत्तीसड राज्यातील रायपूर मागील आठवड्यात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यावेळी सोनिया गांधी यांनी भाषणादरम्यान, राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. राहुल गांधी यांनी नुकत्याच पूर्ण केलेल्या भारत जोडो यात्रेचं त्यांनी कौतुक केलं होतं. रायपूर येथील काँग्रेसच्या या अधिवेशनात सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.
रायपूर येथील अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान एक किस्सा सांगितला होता. 1977 सालची निवडणूक होती. राहुल गांधी म्हणाले, घरात वेगळंच वातावरण होतं. मी आईला विचारलं काय झालं? ती म्हणाली, आपण हे घर सोडतोय. मी लहान होतो. ते आपलंच घर आहे, असं समजत होतो. पण त्या दिवशी कळलं ते आमचं नव्हतं. ते सरकारचं घर होतं. मी विचारलं आता आपण कुठे जाणार? आई म्हणाली माहिती नाही. मला खूप भीती वाटली. ते आमचच घर समजत होतो. पण तसं नव्हतं. ५२ वर्ष झाली. आजही माझं घर नाहीये… राहुल गांधींनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सोनिया गांधीदेखील भावूक झाल्या होत्या.