जयपूर : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा द्यावा लागणार आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला गेहलोत समर्थक आमदारांनी विरोध केला आहे. याच मुद्द्यावर गेहलोत गटाच्या तब्बल 92 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. 92 आमदारांनी राजीनामा दिल्यानं राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. या बंडखोर आमदारांसोबत पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. या आमदारांनी आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून राजीनामा दिलेल्या आमदारांनी आता काँग्रेस हायकमांडसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. त्यातील पहिली प्रमुख अट अशी आहे की 2020 च्या राजकीय संकटात सरकार वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावं
तर दुसरी अट अशी आहे की, जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत आमदारांची बैठक बोलावू नये . आता हायकमांड या आमदारांच्या अटी मान्य करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशोक गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सचिन पायलट हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. गेहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सचिन पायटल यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करत राजस्थानमध्ये एकाच वेळी 92 आमदारांनी राजीनामे दिले आहेत,