Railway News : रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात पूर्वी सवलत दिली जात होती. ती सवलत कोरोनाकाळात बंद करण्यात आली. कोरोना साथ गेल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना सवलत बहाल केलेली नाही. कॉंग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना गुरुवारी पत्र लिहीले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रवासात सवलत बहाल करावी अशी मागणी कार्ति चिदंबरम यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.
कॉंग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहीले आहे. या रेल्वे भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या भाडे सवलतीच्या निर्णयाचा पुन्हा चिकीत्सा करावी, हवे तर किमान स्लीपर कोच आणि थर्ड एसीतील ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत पूर्ववत सुरु करावी, ज्यामुळे वास्तवात ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळू शकेल असेही कार्ति चिदंबरम यांनी म्हटले आहे. भारतीय रेल्वेची सेवा प्रवाशांच्या सोयीची असावी आणि नागरिकांना सहज आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मार्च 2020 मध्ये कोविड-19 च्या साथीमुळे रेल्वे प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी तिकीट सवलत रद्द केली होती. कोरोना साथीचा प्रभाव कमी झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली आणि हळूहळू निर्बंध शिथिल झाले, परंतू तरीही कोरोना साथ संपल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले. परंतू आजतागायत रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करण्यात आलेली नाही. रेल्वे प्रवासात 60 वर्षांवरील ज्येष्ठ पुरुष आणि 58 वर्षांहून अधिक ज्येष्ठ महिलांना रेल्वे तिकीटात अनुक्रमे 40 टक्के आणि 50 टक्के सवलत दिली जाते. कार्ति चिदंबरम यांनी पत्रात म्हटले आहे की ऑगस्ट 2022 मध्ये रेल्वेशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने विविध श्रेणींना देणाऱ्या सवलतींवर पुन्हा विचार करण्यात यावा अशी शिफारस केली होती.
कार्ति चिदंबरम यांचे रेल्वेमंत्र्यांना लिहीलेले पत्र –
I have written to the re appointed @RailMinIndia @AshwiniVaishnaw about bringing back Senior Citizens Concessions & also regarding ticketless travellers occupying reserved berths. https://t.co/JRBBkwJCf1 pic.twitter.com/K2dmugCWR9
— Karti P Chidambaram (@KartiPC) June 13, 2024
20 मार्च 2020 आणि 31 जानेवारी 2024 दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करण्यातून रेल्वेला 5,800 कोटींचा फायदा झाला होता अशी माहीती आरटीआयमार्फत उघडकीस आली होती. रेल्वेचे नेटवर्क आशियातील सर्वात मोठे असून जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. रेल्वेच्या एकूण कमाईच्या तुलनेत ही वाचलेली रक्कम काहीच नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले होते.
11 जून 2024 मध्ये चेन्नई सेंट्रल – हावडा सुपरफास्ट मेल चेन्नईत पकडता न आल्याने त्यांना आरक्षित कम्पार्टमेंटमधून बेकायदेशीरपणे प्रवास केल्याची घटना उघडकीस आली होती. प्रत्येक प्रवाशाचे तिकीट गर्दीत तपासणे कठीण असल्याची कबूली रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली होती. या ट्रेनमध्ये अनेक तिकीट असलेल्या प्रवाशांना दुसरा काही पर्याय नसल्याने चक्क उभ्याने प्रवास करावा लागला होता. विनातिकीट प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच पुरेशा गाड्या नसल्याने प्रवाशांना डब्यातून कोंबलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागत असल्याच्या घटनांनी सोशल मिडीया भरलेला आहे. त्यामुळे यावर रेल्वेने योग्य उपाय शोधून काढावा असेही कार्ति चिदंबरम यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.