नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी ती अधिकच रंजक होऊ लागली आहे. अशोक गेहलोतांचे नाव मागे पडताच दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या नावामुळे आणि निवडणुकीतील प्रवेशामुळे ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणुकीबाबत अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरीतच राहणार का असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आता या निवडणुकीतील लढत शशी थरूर विरुद्ध दिग्विजय सिंग अशी होणार की? आणि तिसरा उमेदवाराला यामध्ये संधी मिळणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
तर या निवडणुकीत दिग्विजय सिंहांचा झालेला प्रवेश हा अशोक गेहलोतांना वेगळा संदेश देण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात आणले आहे का अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजय सिंह यांचा हा प्रवेश राजस्थानातील काँग्रेस पक्षातील गटबाजीचा परिणामही असू शकतो असं राजकीय विश्लेषक मानतात. तर दबावाच्या राजकारणाचा तो भाग असण्याची शक्यताही आहे.
दिग्विजय सिंह यांच्या प्रवेशामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. पक्षात अंतर्गत लोकशाही असून कोणीही निवडणूक लढवू शकतो हेही यातून दाखवायचे आहे.
दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार असले तरी देशभरात प्रचाराला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर याउलट भारत जोडो यात्रेत आपली भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजस्थानातील काँग्रेसमध्ये मोठे संकट उभा राहिले असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही दिल्लीत पाचारण केले गेले होते. त्यामुळे ते आज रात्री किंवा उद्या गुरुवारी सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात. राजस्थानमधील पक्षांतर्गत झालेल्या गदारोळामुळेही काँग्रेसचे हायकमांड नाराज आहे.
गेहलोत यांनी अध्यक्षपदासाठी आणि सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवण्याच्या अंतर्गत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे राजस्थानातील बंडखोर आमदारांवर पक्षाकडून कारवाईही केली गेली आहे.
गेहलोत यांच्या तीन निकटवर्तीयांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा सवालही उपस्थित केला गेला होता.
काँग्रेस वर्किंग कमिटीने तीन आमदारांवर कारवाई केली असली तरी अशोक गेहलोत यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
त्यामुळे अशोक गेहलोत यांना अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचेच मानले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधींची भेट घेऊन गेहलोत आपला पुढील निर्णय देऊ शकतात अशीही शक्यता आहे.