नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election 2022) तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अशी , निवडणूक लढवली जात आहे. या निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापैकी एकही गांधी घराण्यातील उमेदवार यामध्ये सहभागी झाला नाही. 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा (Congress) अध्यक्ष होत आहे. सोमवारी पक्षाध्यक्षपदासाठी मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांची निवडणुकीची तयारी ही अंतिम टप्यात आली आहे.
काँग्रेस कमिटीचे 9 हजारहून अधिक मतदार असल्याने व मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे दोन्हीही उमेदवार विविध राज्यांचा दौरा करत आहेत.
या पदासाठी खर्गे यांनाच पहिली पसंदी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांनाच पाठिंबा देत आहेत. खर्गे यांना पाठिंबा मिळत असला तरी थरुर यांनी मात्र पक्षांतर्गत बदलावर जोर दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेस निवडणुकीविषयी माहिती सांगताना म्हणाले की, काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी ही सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत आहेत.
प्रसारमाध्यमांनी 1939, 1950, 1997 आणि 2000 चा उल्लेख केला आहे, पण निवडणुकाही 1977 मध्ये झाल्या होत्या आणि त्यावेळी जेव्हा कासू ब्रह्मानंद रेड्डी हे निवडून आले होते.
काँग्रेस पक्षात या अंतर्गत निवडणुका होत असल्या तरी जयराम रमेश यांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया देत संघटनात्मक निवडणुका या पक्षाला मजबूत करतात.
मात्र त्याचवेळी वैयक्तिक हेतू आणि हेवेदावेही उफाळून येतात. त्यामुळे समुहाच्या आणि गटा तटाच्या राजकारणमुळे मात्र अशा पक्षीय निवडणुकांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
याबरोबरच जयराम रमेश यांनी निवडणुकीविषयी मत व्यक्त करताना सांगितले की, सध्या या निवडणुकीपेक्षा मी जास्त महत्व देतो ते भारत जोडो यात्रेला.
कारण भारतीय राजकारणासाठी काँग्रेसचा हा एक परिवर्तनवादी उपक्रम असल्याचे सांगितले. 1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी यांच्यात लढत झाली.
या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे टंडन हे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पसंतीचा उमेदवार असूनही निवडणूक जिंकली होती.
त्यानंतर 1977 मध्ये देवकांत बरुआ यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली, त्यामध्ये के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी सिद्धार्थ शंकर रे आणि करण सिंग यांचा पराभव केला होता अशी माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
काँग्रेसमध्ये 20 वर्षांनी 1997 मध्ये पक्षाध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली होती. मात्र त्यानंतर सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यात तिरंगी लढत झाली होती.
केसरीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता काँग्रेसच्या सर्व राज्यातील नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळ त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
त्यानंतर 2000 मध्ये जितेंद्र प्रसाद आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी सोनिया गांधींकडून त्यांचा दारुण पराभव झाला होता.
काँग्रेसच्या इतिहासात या सगळ्या घडामोडी झाल्यामुळे आगामी निवडणुकही नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आता पक्षाच्या सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी यांच्या जागी नवे अध्यक्ष येणार आहेत.
स्वातंत्र्यानंतर, 1948 मध्ये सीतारामय्या यांनी एआयसीसीचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता, त्यानंतर आतापर्यंत काँग्रेसमधील 17 लोकांनी पक्षाचे नेतृत्व केले असून त्यापैकी पाच गांधी कुटुंबातील सदस्य आहेत.
इंदिरा गांधी 1959 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या त्यानंतर एन.एस रेड्डी यांनी 1963 पर्यंत पक्षध्याक्ष म्हणू ही जबाबदारी सांभाळली होती. कामराज हे 1964-67 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते तर एस निजलिंगप्पा 1968-69 पर्यंत या पदावर राहिले होते.
त्यानंतर 1970-71 पर्यंत जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि त्यानंतर डॉ. शंकरदयाल शर्मा 1972-74 पर्यंत, तर देवकांत बरुआ 1975-77 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते.
त्यानंतर 1977-78 मध्ये के. ब्रह्मानंद रेड्, त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी यांनी 1978-84 पर्यंत पक्षाची कमान आपल्या हाती सांभाळली.
इंदिरा गांधी यांच्यानंतर 1985 ते 1991 पर्यंत त्यांचे पुत्र राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर 1992-96 पर्यंत पी. व्ही. नरसिंह राव काँग्रेसचे अध्यक्ष होते.
त्यानंतर केसरी यांनी पदभार स्वीकारला होता, तरत्यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा बनल्या. त्यांच्यानंतर 2017 मध्ये राहुल गांधी अध्यक्ष झाले आणि 2019 राहुल गांधींनी राजीनामा दिला आणि सोनिया गांधींना पुन्हा पक्षाच्या अध्यक्ष पदी बसवले.