नवी दिल्लीः देशात काँग्रेस सत्तेवर नसतानाही पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे साऱ्यांचे लक्ष काँग्रेसकडे लागले आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Congress President Election 2022) उमेदवारी अर्ज भरण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी जेव्हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या अध्यक्षा झाल्या तेव्हा आश्चर्यकारक निकाल लागले होते. 1998 मध्ये सोनिया गांधी पहिल्यांदाच पक्षाच्या अध्यक्षा (President) झाल्या होत्या. तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी अचानक सीताराम केसरी यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.
सीताराम केसरी यांना जीपमधून पक्ष कार्यालयाबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सोनिया गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
या घटनेच्या एक वर्षानंतर शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उघडपणे बंड केले होते.
त्यावेळी सोनिया गांधी रजकीयदृष्ट्य कमकुवत असल्याचे सांगत त्या पक्ष चालवण्यास योग्य नाहीत असं मत व्यक्त केले गेले होते.
ज्या नेत्यांनी बंडखोरी केली होती ते नेते पक्षतून बाहेर गेले होते. त्यामुळे आता इंदिरा गांधींच्या कार्यकाळापासून त्यांना आव्हान देऊ शकतील असे दोनच दिग्गज काँग्रेसमध्ये होते.
त्याकाळातील काँग्रेस पक्षातील दिग्गजांपैकी एक होते, सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट आणि दुसरे होते जितेंद्र प्रसाद. त्यांना राजेश पायलट यांच्यापेक्षा कमी अनुभवी मानले जात होते. राजेश पायलट हे राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मंत्री होते.
1996 मध्ये सीताराम केसरी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर मात्र राजेश पायलट काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
मात्र त्यानंतर थेट सोनिया गांधी यांनाच अध्यक्ष पदावर विराजमान केले गेले होते. मात्र केसरी यांचा कार्यकाळा संपल्यानंतर मात्र सोनिया गांधी नियमानुसार निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या.
त्यावेळी सोनिया गांधी बिनविरोध अध्यक्ष होतील असे मानले जात होते, त्याप्रमाणेच त्यांची निवडही झाली होती. त्या निवडणुकीत त्यांना 99 टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात येते.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीपोटी सोनिया गांधी प्रत्यक्षात अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत असं मानले जात होते.
त्या स्वबळावर विजयी झाल्या नाहीत असंही सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष पदामुळे पक्षात प्रचंड नाराजी वाढली होती. त्यातच शरद पवारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर, राजेश पायलट घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.
त्यावेळी राजेश पायलट यांनी जयललिता आणि लालू प्रसाद यादव यांच्याशी युती करुन पक्षातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आवाज उठवला होता. आणि उघड उघड त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला होता.
सोनिया गांधींच्या अध्यक्ष पदानंतर राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींविरोधात आघाडी उघडली होती.
त्यानंतर काही दिवसातच राजेश पायलट यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. तर दुसरीकडे जितेंद्र प्रसाद हे सोनिया गांधींसमोर मोठे आव्हान होते. ज्यांना राजीव गांधी यांनी 1985 मध्ये काँग्रेसचे सरचिटणीस आणि नंतर त्यांचे राजकीय सचिव केले होते.
जितेंद्र प्रसाद काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असतानाच त्यांनी पक्षाध्यक्षपदाची निवडणूकही सोनिया गांधी यांच्याविरोधातच लढवली होती. त्यांना काही राज्यांतूनही पाठिंबा मिळाला होता, पण देशातील महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला नसल्याने त्यांना सोनिया गांधींना पराभूत करणे शक्य झाले नव्हते.