नवी दिल्ली : पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाणवत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर चेष्टेने बोलत वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. “धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा. बेड कमी पडलेत, औषधं कमी पडत आहेत, अंत्यसंस्काराला स्मशानभूमी कमी पडल्यात, मरतो आहे बाबा असं म्हणून चहूबाजूंनी नकारात्मक वातावरण तयार केलंय,” असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं. रामदेव बाबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक लोक रामदेव बाबांचं हे वक्तव्य असंवेदनशीलपणा असल्याचं म्हणत टीका करत आहेत (Controversial statement on Ramdev baba on Oxygen shortage in India amid Corona).
VIDEO: ऑक्सिजन तुटवड्याची रामदेव बाबांकडून चेष्टा, वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियावर जोरदार टीका#RamdevBaba #OxygenShortage #CoronaEffect #Covid19 #Corona pic.twitter.com/INxDK5FHQW
— Pravin Sindhu (@PravinSindhu) May 7, 2021
“बावळ्यांनो ऑक्सिजन घ्या की, बाहेर सिलेंडर काय शोधता नाकाने श्वास घ्या”
रामदेव बाबा म्हणाले, “देवाने मोफत ऑक्सिजन दिलाय. घ्या की ऑक्सिजन. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय आणि यांना ऑक्सिजन कमी पडतोय. बावळ्यांनो ऑक्सिजन घ्या की. बाहेर सिलेंडर शोधत आहेत. आपल्या शरीरात दोन सिलेंडर (नाकपुड्या) लावलेले आहेत, त्याने शरीरात ऑक्सिजन भरा. म्हणे सिलेंडर कमी पडले.”
कुत्सितपणे हसत रामदेव बाबा म्हणाले, “लोक नाकाचा उपयोग करुन श्वास घेत नाहीत”
विशेष म्हणजे रामदेव बाबा ऑक्सिजन तुटवड्यावर बोलताना अत्यंत तुच्छतेने आणि चेष्टेच्या स्वरुपात बोलत होते. ते पुढे म्हणाले, “डॉक्टर (रामदेव बाबांसोबत योगा करणारे गृहस्थ) म्हणतात आपल्या शरीरात नाकाच्या रुपाने दोन सिलेंडर दिलेत, पायाच्या रुपात दोन डॉक्टर दिलेत आणि हाताच्या रुपात दोन नर्सेस दिल्या आहेत. लोक या सर्व गोष्टींचा उपयोग करती नाही. याचा उपयोग करुन शरीरात ऑक्सिजन भरा.”
“अरे धीर तर धरा, मरुन चाललात का? बेड, औषधं, स्मशानभूमी कमी पडले सांगून नकारात्मक वातावरण करताय”
“कुणालाही ऑक्सिजनची कमतरता पडली तर मला सांगा. ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत खाली आली होती त्यांना मी भस्रीका, कपालभाती, अनुलोम मिलोम एक तास करायला लावून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 98 ते 100 पर्यंत वाढवली. अरे धीर तर धरा. मरुन चाललेत. बेड कमी पडलेत, औषधं कमी पडत आहेत, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडल्या, मरतो आहे बाबा. चहूबाजूंनी नकारात्मक वातावरण तयार केलंय,” असंही रामदेव बाबा म्हणाले.
हेही वाचा :
पतंजलीच्या कोरोनीलच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही; राज्य सरकारचा रामदेव बाबांना झटका
पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण असेल तर मग लसीकरणावर 35 हजार कोटींचा खर्च का? : IMA
पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
व्हिडीओ पाहा :
Controversial statement on Ramdev baba on Oxygen shortage in India amid Corona