नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची (corona virus) भीती पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. यापूर्वी आलेल्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता लोकांना वाटू लागली आहे कारण त्यावेळी रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि ऑक्सिजन आणि औषधांसाठी भीषण संघर्ष झाला होता आणि लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता पुढील 10 दिवसांत कोरोनाचा कहर (corona cases) वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या केसेस वेगाने वाढतील. पण, यातही एक दिलासादायक बाब म्हणजे, 10 दिवसांनंतर कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट होताना दिसू शकते. दरम्यान गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून ( 10 thousand cases) अधिक रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसा, हा संसर्ग अनेक महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असला तरी, सध्या संसर्ग स्थानिक पातळीवर आहे, जो एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित आहे. महामारीबद्दल बोललो, तर संसर्ग मोठे क्षेत्र व्यापेल किंवा त्यामुळे जगातही कहर माजू शकतो.
दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,158 रुग्ण नोंदवण्यात आले असून, गेल्या सात महिन्यांतील हा उच्चांक आहे. हे आकडे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्याने, आता चिंता वाढू लागली आहे. या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, परंतु रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, कोरोनाच्या नवीन XBB.1.16 प्रकारामुळे प्रकरणे वाढत आहेत, परंतु काळजीचे कारण नाही. या विषाणूविरूद्ध लस प्रभावी आहे.
रुग्णालयांत करण्यात आले मॉक ड्रील
ओमिक्रॉनच्या सबवेरियंट XBB.1.16 चा प्रसार वेगाने वाढल्याची नोंद झाली आहे. खरंतर, फेब्रुवारीमध्ये त्याचा प्रसार 21.6% होता, जो मार्चमध्ये 35.8% वर पोहोचला. मात्र, रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची किंवा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली नाही. वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता देशभरात कडक कारवाई सुरू झाली आहे. रुग्णालयांमध्ये तपासाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 एप्रिल रोजी देशभरातील अनेक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तेथेही मॉक ड्रील करण्यात आले.