नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य सरकार सतर्क झाली आहेत. केंद्र सरकारही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत अन्य देशातून आणि राज्यांतून येणाऱ्या लोकांवर पुन्हा प्रवास बंदी लादली जाणार की विमानतळावर प्रवाशांसाठी नवीन प्रोटोकॉल लागू होणार का, असा प्रश्न झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी गुरुवारी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. येथे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,341 वर पोहोचली आहे. देशात बुधवारी एकूण 358 नवीन प्रकरणांपैकी फक्त केरळमध्येच 300 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. येथे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक ३ आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोविड-19 चे एकूण 2,669 सक्रिय रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे केरळमध्ये 3. कर्नाटकात 2 आणि पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालय सध्या केरळवर बारीक लक्ष ठेवून आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जुलै महिन्यात कोरोना संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानुसार भारतात प्रवेश करणाऱ्या 2 टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता काढून टाकण्यात आली होती. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांसाठी नवीन प्रोटोकॉल लागू होणार का असा प्रश्न निर्माण झाला.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतात कोविड-19 जेएन.1 या उपप्रकाराची एकूण 21 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. बहुतेक प्रकरणांवर घरी उपचार केले आहेत. तसेच, सध्या विमानतळांवर कोविड 19 चाचणीसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य करण्याची कोणतीही योजना नाही. तसा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.