नवी दिल्ली : देशात कोरोना स्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून वापर करा. मायक्रो कंटेन्मेंट झोन बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्य सरकारांना केलं आहे. देशातील जनतेचे प्राण तर आपल्याला वाचवायचे आहेतच. पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. (Corona Second Wave, Oxygen, Vaccine and Lockdown, know 10 points from PM Modi’s speech)
“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता भासणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावेत. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यावी. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी अगदी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.
देशातील नागरिकांना उद्देशून मोदी म्हणाले की, देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. उद्या रामनवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा संदेश हाच आहे, आपण मर्यादेत राहावं. कोरोना नियमांचं पालन शतप्रतिशत करा. ‘दवाई भी कडाई भी’ हा मंत्र कायम ठेवा. रमजानच्या पवित्र महिन्याचा आज 7 वा दिवस आहे. रमजान धैर्य, अनुशासनाची शिकवण देतो. या शिकवणीचं पालन करा.
कोरोनाच्या या संकटात देशात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यावर मार्ग काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. ऑक्सिजन आवश्यक आहे त्यांना मिळायलाच हवा. राज्यांमध्ये नवे प्लांट सुरु केले जात आहेत, औद्योगिक ऑक्सिजन मेडिकलमध्ये रुपांतरीत, ऑक्सिजन रेल्वे असे प्रत्येक प्रयत्न सुरु आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको. कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतले तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत”.
कोरोना महामारीत देश मोठी लढाई लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. जो त्रास तुम्ही सहन केला, जो त्रास तुम्ही सहन करत आहात, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं, त्यांच्याप्रती देशाकडून संवेदना. कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा वेगळी आहे.
“देशात औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकारे फॉर्मा कंपन्यांची मदत घेतली जातेय. आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे. त्याचबरोबर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्याचं कामही सुरु आहे. काही शहरांमध्ये मोठी कोव्हिड रुग्णालयं उभारली जात आहेत”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण भाग्यशाली आहोत, कारण आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे, जे वेगानं औषधं बनवत आहे. आपण रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढवत आहोत. आज जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. त्याची साठवणूकही योग्य होत आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. आता देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यामुळे शहरात जे काम करत आहेत, त्यांना सर्वांना लस मिळेल.
पंतप्रधान मोदींनी यावेळी राज्य सरकारांना विनंती केली आहे, की राज्य सरकारांनी कामगारांना विश्वास द्यावा की, ते जिथे असतील तिथेच राहावं. त्यामुळे त्यांचं कामही सुरु राहील आणि तिथेच लसीकरणही होईल. मजुरांनी स्थलांतर करु नये. ते जिथे असतील, तिथेच त्यांना लस दिली जाईल. श्रमिकांना लस मिळेल, अशी व्यवस्था तयार केली जात आहे.
सध्या देशात लसीकरणाचं काम जोरात सुरु आहे. आपला भारत दोन मेड इन इंडिया लसींसोबत जगभरातील मोठं लसीकरण अभियान राबवत आहे. जास्तीत जास्त आणि गरजू लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात अतिशय वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. या लढाईत कोव्हिड वॉरियर्स, आणि वृद्धांना लस दिली गेली आहे. बहुतांस ज्येष्ठांच लसीकरण पूर्ण झालं आहे. कोरोना योद्ध्यांनादेखील लस दिली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. भारतात जी लस बनेल त्याचा अर्धा वाटा थेट रुग्णालय आणि देशाला मिळेल”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, वर्षभरापूर्वी कोरोना रोग जेव्हा पसरु लागला होता, तेव्हा आपल्याकडची परिस्थीती बरी नव्हती. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आज आपल्याकडे टेस्टिंग आहे, लस आहे, उपचार आहेत, कोव्हिड सेंटर्सदेखील आहेत, त्यामुळे आपण कोरोनाशी लढून त्यावर मात करु.
“कोरोना विरोधात लढण्यासाठी अनुशासनाची गरज आहे. गरज असेल तरच बाहेर पडा. मी आपल्याला विनंती करतो. तुमचं धैर्य आणि साहसामुळे आजच्या परिस्थिती बदलण्यास देश कोणतीही कसर सोडणार नाही. आपलं कटुंब आणि तुम्ही निरोगी राहा”, असं मोदी म्हणाले.
संबंधित बातम्या
देशात लसीकरणाचा वेग दुप्पट करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
(Corona Second Wave, Oxygen, Vaccine and Lockdown, know 10 points from PM Modi’s speech)