मुंबई : जगभरात आणि भारतात दोन वर्षे कोरोनानं थैमान घातलं. लाखो लोकांचा जीव गेला, लाखो अनाथ झाले. तर अनेकांच्या प्रकृतीवर दीर्घ परिणाम या कोरोनामुळे झाला. मात्र, आता कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे. जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. अशावेळी कोरोना विषाणूशी दोन हात करणं आता अधिक सोपं होणार आहे. कारण मुंबईतील एका कंपनीने खास नेझल स्प्रे (Nasal Spray) तयार केलाय. या एन्टी कोविड स्प्रेचं परिक्षण कोरोना लस घेतलेले आणि कोरोना लस न घेतलेल्या 306 जणांवर करण्यात आलं. त्याचे परिणाम अपेक्षेनुसार फायदेशीर ठरले आहेत. मुंबईतील औषध निर्मिती कंपनी ग्लेनमार्कने (Glenmark) कॅनडातील कंपनी सॅनोटाईजसोबत मिळून हा नेझल स्प्रे तयार केला आहे. नाकावाटे या स्प्रेचा वापर केल्यानंतर कोरोना रुग्णांवर 24 तासांत विषाणूचा प्रभाव 94 टक्के कमी होतो. तर 48 तासात या विषाणूचा प्रभाव 99 टक्क्यांनी कमी होतो. द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया जर्नलमध्ये या स्प्रेचा तिसऱ्या टप्प्यातील अहवाल प्रकाशित करण्यात आलाय.
मुंबईतील औषध निर्माती कंपनी ग्लेनमार्कने या नेझल स्प्रेचा शोध आणि परिक्षण केलं आहे. यासह या कंपनीने देशातील पहिला कोरोना विषाणू रोधक नेझल स्प्रे तयार करण्याचा मान पटकावलाय. या वर्षी फेब्रुवारीमध्येच हा स्प्रे लॉन्च करण्याची परवानगी कंपनीने सरकारकडून घेतली होती. त्यानंतर हा स्प्रे आता लॉन्च करण्यात आला आहे.
परिक्षणा दरम्यान कोरोना रुग्णांच्या नाकात हा स्प्रे मारुन 7 दिवसाच्या उपचारावेळी त्याचा परिणाम जाणून घेण्यात आला. सर्व रुग्णांसाठी दिवसातून दोन वेळा या स्प्रेचा वापर करण्यात आला. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव 24 तासात 94 टक्के तर 48 तासात 99 टक्के संपल्याचं दिसून आलं.
महत्वाची बाब म्हणजे या स्प्रेचं परिक्षण देशात डेल्टा आणि ओमिक्रॉन विषाणूचे अनेक रुग्ण आढळून येत होते. गंभीर रुग्णदेखील 24 तासात स्वस्थ होत असल्याचं या स्प्रेच्या परिक्षणावेळी दिसून आलं.
भारतात या नेझल स्प्रेच्या 25 मिली लीटरच्या बाटलीची किंमत 850 रुपये असणार आहे. भारतात या स्प्रेची किंमत अन्य देशांच्या तुलनेत खूप कमी आहे, असा ग्लेनमार्कचा दावा आहे. आठवड्याभरात हा स्प्रे विक्रीसाठी उपलब्ध होईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलंय.