नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी होण्याचं काही नाव घेत नाही. 2 राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रात ही प्रकरणं वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजारांच्या पुढे गेली असल्याने आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आले आहे. येथे कोरोनाचा सकारात्मकता दर 2 टक्क्यांवरून सुमारे 5 टक्के झाला आहे. मात्र महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण वाढत नाही ही गोष्ट राज्यासाठी दिलासादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हॉस्पिटलायझेशन वाढत आहे. मुंबई, महाराष्ट्रात कोविड वॉर्ड कार्यान्वित करण्यात आले असून रुग्णालयांमध्ये सुमारे 20 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.
दुसरीकडे दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये कोविडची 300 च्या वर काही प्रकरणे समोर आली आहेत. राजधानीत संसर्गाचे प्रमाण 13 टक्क्यांच्या पुढे गेले असून मृत्यूचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. गेल्या 24 तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चार महिन्यांनंतर राजधानीत कोविडची 300 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर बाधिता रुग्णामध्ये गंभीर लक्षणे आढळून येत नसली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण वाढत्या केसेस पाहता तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
देशात कोविडचा आलेख आता दिवसेंदिवस वर जाणार असल्याचे कोविड तज्ज्ञ डॉ. कमलजीत सिंग यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसात नवीन केसेस वाढण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.
हवामानातील बदल आणि ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांमुळे हे घडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळेच लोकांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी मास्क वापरा आणि फ्लूची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
कोविडची वाढती प्रकरणे आणि नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जीनोम सिक्वेन्सिंगच्या मदतीने कोणताही नवीन प्रकार सहज शोधता येतो. याशिवाय चाचणी, ट्रॅक, उपचार आणि लसीकरण वाढवण्यावरही राज्य सरकारनी भर दिली आहे. तर कोविडला रोखण्यासाठी लोकांना बूस्टर डोस मिळावा अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशात नोव्हेंबरनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांनी 13 हजारांचा आकडा पार केला आहे. चार महिन्यांनंतर कोविडच्या रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे.तसेच केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्येही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले आहे.