Cyclone fengal at Tamilnadu : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्याया ठिकाणी ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ डिसेंबरपर्यंत तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या चक्रीवादळामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री 10:30 ते 11:30 च्या दरम्यान किनारपट्टी ओलांडण्यास सुरुवात होईल. यानंतर हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तर पुद्दुचेरीजवळील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी असेल आणि हा वेग ताशी ९० किमी पर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या हे वादळ पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेने हळूहळू पुढे सरकत राहील. त्यानंतर काही तासांत हे चक्रीवादळ उदासीन होईल.
तामिळनाडूला मोठा दिलासा
तामिळनाडूचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांच्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळानंतर कोणतेही मोठे नुकसान झालेल्या वृत्त अद्याप तरी समोर आलेले नाही. सध्या राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चेन्नईसह काही भागात पाणी तुंबले आहे. त्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच यामुळे चेन्नई विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे दोन धावपट्टी आणि एक टॅक्सीवे वर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत 55 उड्डाणे रद्द करण्यात आली असून 19 उड्डाणे वळवण्यात आली आहेत. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हीही उड्डाणांचा समावेश आहे.
अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला
चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागात 18 आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि त्यांचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी याबद्दलचा कृती आराखडा तयार केला असून त्यांनी याचा आढावा घेतला. तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
अम्मा कॅन्टीनमध्ये मोफत जेवण
चेन्नईत पाणी साठल्याने बहुतांश अम्मा कॅन्टीनमध्ये मोफत जेवण देण्यात येत आहे. सद्यस्थितीत 334 ठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा करण्यसााठी 1700 मोटर पंप युद्धपातळीवर सुरु आहेत. तसेच 27 झाड पडल्याच्या घटना घडल्या असून ही झाडं तातडीने हटवण्यात आली आहे. त्यासोबतच 22 पैकी 6 भुयारी मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. भुयारी मार्गात साचलेले पाणी स्वच्छ करण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहिती महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी दिली.