नवी दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी आमच्यासोबत यावं, असं आवतनच ठाकरे गटाने पंकजा मुंडे यांना दिलं आहे. ठाकरे गटाच्या या आवतनाची शिंदे गटाचे नेते, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खिल्ली उडवली आहे. पंकजा मुंडे ठाकरे गटात येऊन काय करणार? असा खोचक सवालच दीपक केसरकर यांनी विचारला आहे.
पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये येऊन नेमकं काय करणार? पंकजा यांना ते राज्यसभेवर तर पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, असा चिमटा दीपक केसरकर यांनी काढला आहे. आधीच त्यांची बोलणी प्रकाश आंबेडकरांशी सुरू आहे. तिथेही राष्ट्रवादीवर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, असंही ते म्हणाले.
त्यापेक्षा ते बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम राहिले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा चिमटा त्यांनी काढला आहे. तसेच संजय राऊत म्हणतात समन्वय हवा. त्यांना राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजित दादांना घाई झाली असावी. आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आघाडीवर होती. हे सर्वांनाच माहीत आहे, असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर आज 4 वाजता राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दीपक केसरकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठ्यांची शौर्यगाथा ही महत्त्वपूर्ण आहे. पानिपतमध्ये नक्कीच एक स्मारक व्हायला हवे. आम्ही राज्य सरकार म्हणून नक्की त्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.