दिल्ली : दिल्लीच्या विजया पार्क परिसरात एक पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सध्या तरी या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. पण या इमारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील रस्त्यांवरील वाहतूक बंद केली असून ढीगारा काढण्याचं काम सुरु आहे. ही इमारत नक्की कशामुळे पडली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
इमारत पडल्याचा 29 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इमारत पडताना पाहून आसपासचे लोकं जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. या दुर्घटनेत आसपासच्या काही दुकानांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही इमारत खुप जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.
#WATCH | Delhi: A building collapsed in Vijay Park, Bhajanpura. Fire department present at the spot, rescue operations underway. Details awaited
(Video Source – Shot by locals, confirmed by Police) pic.twitter.com/FV3YDhphoE
— ANI (@ANI) March 8, 2023
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “इमारत कशी कोसळली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाला दुपारी 3 वाजून पाच मिनिटांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बचाव दल घटनास्थळी दाखल झालं.”
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या देहातमधील नजफगड भागात एका तीन मजली इमारतीचा वरचा भाग कोसळला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं होतं.