Delhi New Chief Minister : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. आज अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यापलांकडे सोपवणार आहेत. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबद्दल चर्चा रंगली आहे. अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव समोर आले आहे. तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल राजीनामा देणार
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या आठवड्यात जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर केजरीवाल यांनी एक जाहीर सभा घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यानंतर दिल्लीच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली. ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर सही करणार नाहीत, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने ठेवली होता. यामुळे अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले. आज दुपारी अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करतील.
त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आप मधील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे. या प्रस्तावाला सर्वच नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सध्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्रीपद सांभाळत आहेत. आता आम आदमी पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल. यानंतर याच आठवड्यात नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडले.
यानतंर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे. सरकारकडे निवडणुकीसाठी अवघे ५ महिने उरले आहेत. मात्र केजरीवाल यांना न्यायालयाने काही अटी घालून दिल्या आहेत. त्यातच तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती लाट आहे. दिल्लीत दोन-तीन महिने अगोदर निवडणुका घेण्याची मागणी केजरीवाल यांना केली आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी एक नवी खेळी केली आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.