दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून काल रात्री अटक करण्यात आली होती. कथिक मद्यविक्री घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांना रात्रभर ईडीच्या कार्यालयात राहावं लागलं. त्यानंतर त्यांना आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात दोन्ही बाजूने प्रचंड युक्तिवात करण्यात आला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. ईडीच्या युक्तिवादात अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात आली. पण अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी ती मागणी फेटाळण्याची विनंती कोर्टापुढे केली.
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडी कोठडीबाबतचा निकाल काही काळासाठी राखून ठेवला. त्यानंतर आता कोर्टाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. हा दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षासाठी मोठा झटका आहे. आता अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार आहेत. अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता. मद्य घोटाळा 100 नाही तर 600 कोटींचा आहे. गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले, यासाठी हवालाचाही वापर झाला. केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला, असा आरोप ईडीने आपल्या युक्तिवादातून केजरीवालांवर केला.
दुसरीकडे, मी जेलमध्ये राहो की बाहेर, देशासाठी माझं जीवन समर्पित असल्याची प्रतिक्रिया केजरीवालांनी कोर्टरुममध्ये जात असताना TV9ला दिलीय. केजरीवालांना अटक झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. त्यानंतर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. घाबरलेल्या हुकूमशाहाला मृत लोकशाही बनवायची आहे. माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होतं. म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट आहे. इंडिया आघाडी जोरदार प्रत्युत्तर देणार, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.
केजरीवालांच्या अटकेवरुन ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारेंनीही प्रतिक्रिया दिलीय. दारु नीतीमुळंच केजरीवालांना अटक झाली. चूक केली तर शिक्षा झालीच पाहिजे असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. 2011मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंसोबत केजरीवालही होते. अण्णांच्या स्टेजवरुन लढण्यापेक्षा आम आदमी पार्टी स्थापन करुन ते 3 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. सरकारी दारु नीतीमध्ये घोटाळा आहे की नाही हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून केजरीवाल मुख्यमंत्री झाले त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवालांना अटक झाली.