शरद पवार गटाला मोठा धक्का; पदाचा राजीनामा देणारा तरूण चेहरा धीरज आहेत तरी कोण?

| Updated on: May 26, 2024 | 8:56 AM

Dheeraj Sharma May Be Will leave From NCP Sharad Pawar Group : देशात लोकसभा निवडणूक होत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा युवा चेहरा पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर...

शरद पवार गटाला मोठा धक्का; पदाचा राजीनामा देणारा तरूण चेहरा धीरज आहेत तरी कोण?
Follow us on

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशात आता निकालाची प्रतिक्षा केली जात आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे. अशात राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. ऐन निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दिल्लीतील युवा चेहरा शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे धीरज शर्मा हे पक्षाला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

‘तो’ नेता पवारांची साथ सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते धीरज शर्मा हे पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. धीरज शर्मा यांनी जरी पक्षातील पदांचा म्हणजेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धीरज शर्मा यांची फेसबुक पोस्ट

मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, अशी फेसबुक पोस्ट धीरज शर्मा यांनी लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना राष्ट्रवादी पक्षाच्या फेसबुक पेजला, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना धीरज शर्मा यांनी मेन्शन केलं आहे.

धीरज शर्मा कोण आहेत?

धीरज शर्मा हे राष्ट्रवादीतील युवा चेहरा आहेत. धीरज शर्मा दिल्लीत राहतात. दिल्लीतील तरूण वर्गाशी त्यांचा संवाद आहे. युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 2019 ला महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती. तेव्हा सुरु असलेल्या ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’मध्ये धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या दिल्लीतील युवा नेत्यांचा मोठा वाटा राहिला.