दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात घबाड सापडले. त्यांच्या बंगल्याला आग लागल्याचे निमित्त झाले आणि हा प्रकार समोर आला. त्यांच्या बंगल्याला लागलेली आग विझवण्यात आल्यानंतर मोठी रक्कम सापडली. त्यामुळे न्याय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील कॉलेजियमने लागलीच कारवाई करत, संबंधित न्यायमूर्तींची बदली केली आहे. त्यांची रवानगी अलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा वर्मा हे शहरात नव्हते.
कोट्यवधी रुपयांचा पाऊस
बंगल्याला आग लागताच वर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचरण केले. आग विझवल्यानंतर एका खोलीत मोठी रक्कम सापडली. सगळीकडे नोटाच नोटा पडल्याचे दिसून आले. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम पाहून सगळेच चक्रावले. त्यानंतर कोर्टातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची नोंद केली. तर आता याप्रकरणात ईडी आणि सीबीआयच्या एंट्रीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केवळ बदलीवरच दाबणार प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या काही सदस्यांनी ही गंभीर घटना असल्याने केवळ बदली करून भागणार नाही, असे मत नोंदवल्याचे समोर येत आहे. वर्मा यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे त्यांना सुचवण्यात आल्याचे कळते. जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली नाही तर त्यांच्यावर इन हाऊस इन्कायरी होऊ शकते. त्यानंतर पुढील कारवाई होईल.
कोण आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा?
न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे दिल्ली हायकोर्टात कार्यरत होते. त्यांची आता अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. अलाहाबाद हायकोर्टातच त्यांनी वकिली केली. पुढे 13 ऑक्टोबर, 2021 रोजी त्यांची न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांची पहिली नियुक्ती ही दिल्ली उच्च न्यायालयातच झाली. त्यांनी आतापर्यंत ठोस आणि कायद्याच्या आधारावर दिलेल्या निकालाची वकिलांच्या वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.