नवी दिल्ली: भाजपचा होमपीच असलेल्या गुजरातमध्ये नेत्रपदीपक यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP) दिल्लीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सरस कामगिरी करुन दाखविली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ‘आप’ने एकतर्फी यश मिळवले आहे. 28 फेब्रुवारी रोजी याठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये पाचपैकी चार जागांवर ‘आप’चे उमेदवार विजयी झाले आहेत. (Delhi MCD bypoll Election 2021 results)
कल्याणपुरी, रोहिणी-सी, त्रिलोकपुरी आणि शालीमार बाग या चार प्रभागांमध्ये ‘आप’चा विजय झाला. तर चौहान बांगर या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे दिल्ली महानगरपालिका पोटनिवडणुकीत भाजपची पाटी कोरी राहिली. पुढीलवर्षी दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. दिल्लीचा जनता भाजपला कंटाळली आहे. या पोटनिवडणुकांच्या माध्यमातून जनतेने भाजपला संदेश दिला आहे. पुढील निवडणुकीत दिल्लीची जनता ‘आप’लाच विजयी करेल, असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केला.
गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) काँग्रेसला अक्षरश: भुईसपाट केले आहे. गुजरातमधील 31 जिल्ह्यांमधील जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. याशिवाय, 81 महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर तालुका स्तरावरील 231 प्रभागांपैकी 200 तालुका पंचायतींवरही भाजपने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. 28 फेब्रुवारीला पार पडलेल्या या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.
काही दिवसांपूर्वी गुजरातमधील बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्येही भाजपने बाजी मारली होती. भाजपने 2015 साली पाटीदार आंदोलनानंतर काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या सहा महानगरपालिकांची सत्ता पुन्हा मिळवली होती.
तर 2015 मध्ये 31 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला होता. तर तालुका स्तरावर 228 पैकी 138 पंचायतींमध्ये भाजपने सत्ता गमावली होती. मात्र, त्यावेळी निमशहरी भागांमध्ये भाजपने आपली सत्ता राखण्यात कसेबसे यश मिळवले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवून या पराभवाचे उट्टे फेडले आहे.
संबंधित बातम्या:
प्रशांत किशोर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार; एक रुपया पगार घेऊन देणार सल्ला
लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!
… आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी व्यासपीठावरून निघून गेले; बंगालमध्ये बनते बनते बिगड गयी बात!
(Delhi MCD bypoll Election 2021 results)