पूर्व दिल्लीतील विवेक विहार भागात शनिवारी रात्री लहान मुलांच्या रुग्णालयात भीषण आग लागली. या दुर्घटनेत 7 नवजात बालकांचा जीव गेला. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:32 वाजता त्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. लागलीच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. बचाव पथकाचे प्रमुख अतुल गर्ग यांच्या मते, बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
12 तान्हुल्यांची तात्काळ सूटका
दिल्ली अग्निशमन दलाने 12 तान्हुल्यांना तात्काळ बाहेर काढले. त्यांना लगेच इतर रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये 7 नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर एक बालक व्हेंटिलेटरवर आहे. तर इतर लहान बालकं दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्याठिकाणी या बालकांवर उपचार सुरु झाले. काही बालकं या घटनेत होरपळल्याची माहिती समोर येत आहे.
विवेक विहारमध्ये बेबी केअर सेंटर
दिल्लीतील विवेक विहारमध्ये हे बेबी केअर सेंटर आहे. याठिकाणी आग लागताच नवजात बालकांना लागलीच ॲम्ब्युलन्सने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत मृत बालकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. या मुलांच्या आईंच्या किंकाळ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे मन हेलावले. रग्णालयाने या सर्व प्रकारावर अजून कोणतीची प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस आगीच्या घटनेचा तपास करत आहेत.
अग्निरोधक यंत्रणा होती का?
अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. आग भडकली होती. रुग्णालयासह इतर इमारतींना पण आगीने घेरले. अग्निशमन विभागाने तात्काळ आग विझविण्याचे प्रयत्न केले. रात्री आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पोलिस ही आग कशामुळे लागली याचा तपास घेत आहे. या रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा होती की नाही, याची चौकशी करण्यात येत आहे. या रुग्णालयात आपत्कालीन स्थिती बाहेर पडण्याचा मार्ग होता का? हे रुग्णालय रहिवाशी इमारतीत चालविण्यात येत होते का? यासह इतर अनेक बाबींची चौकशी करण्यात येणार आहे.