देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. उद्या हा सोहळा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. अमित शाहांच्या घरी आज संध्याकाळी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं आहे. एनडीएच्या प्रमुख नेत्यांना जेवणाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या घरी हजेरी लावणार आहेत. आजच्या बैठकीत कोणती खाती मिळणार? याची या स्नेहभोजनात चर्चा होणार आहे. याची माहिती एनडीएतील मित्र पक्षांना दिली जाणार आहे.
अमित शाह यांच्या घरी आज एनडीएमधील नेत्यांचं स्नेहभोजन होणार आहे. यावेळी खातेवाटपावर चर्चा होणार आहे. कुणाला कोणतं खातं दिलं जाणार? याची स्पष्टता येणार आहे. उद्या दुपार पर्यंत खातेवाटपाची यादी प्रसिद्ध होणार आहे. आज अमित शाहांच्या घरी डिनर डिप्लोमसी घडणार आहे.
एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटही सरकारमध्ये सामील होणार आहे. राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अजित पवार, सुनील तटकरे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झालं आहे.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. उद्या रविवार 9 जूनला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला विविध देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 7 हजार जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
एनडीए सरकारसोबतच विविध पक्षांअंतर्गतदेखील हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून संसदीय पक्षाच्या व्हिप म्हणून श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीरंग बारणे हे आता संसद अधिवेशन काळात व्हिप म्हणून काम पाहणार आहेत. तर गटनेते पदी श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.