G-20 New Delhi Summit 2023 : वैष्णव जन तो तेने कहिए…; जगातील शक्तीशाली नेते महात्मा गांधींसमोर नतमस्तक

| Updated on: Sep 10, 2023 | 10:37 AM

G-20 New Delhi Summit 2023 : वैष्णव जन तो तेने कहिए...!; जगातील शक्तीशाली नेते महात्मा गांधींसमोर नतमस्तक. कायम स्वरूपी मनास साठवून ठेवावी, अशी दृश्य... भारत जगाला कोणता संदेश देऊ पाहातोय? वाचा सविस्तर...

G-20 New Delhi Summit 2023 : वैष्णव जन तो तेने कहिए...; जगातील शक्तीशाली नेते महात्मा गांधींसमोर नतमस्तक
Follow us on

G-20 New Delhi Summit 2023 : भारताची राजधानी दिल्लीकडे देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष आहे. कारण राजधानी दिल्लीत G-20 परिषद होत आहे. या शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या या दिवसाची सुरुवात या नेत्यांनी राजघाटावर केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला या नेत्यांनी अभिवादन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापर्यंत सगळ्या नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं.

ऋषी सुनक अन् जो बायडन

महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. तेव्हा ऋषी सुनक आणि जो बायडन हेदेखील राजघाटावर होते. यावेळी जो बायडन यांनी आपल्या चपला बाहेर काढून ठेवल्या. केवळ सॉक्स घालून ते गांधींच्या समाधीजवळ पोहोचले. तर ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मात्र चप्पल न घालता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेतही बदल

जेव्हा जगभरातील महत्वाचे नेते राजघाटावर दाखल झाले. तेव्हा तिथे कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता. जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कुठे जातात तेव्हा त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था त्यांच्या सोबत असते. ती घेऊनच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वाटचाल करत असतात. मात्र जेव्हा राजघाटावर जाण्याची वेळी आली तेव्हा यात थोडा बदल करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन जेव्हा राजघाटावर पोहोचले. तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ ब्रीफकेस घेतलेला एक सुरक्षारक्षक होता.

वैष्णव जन तो तेने कहिए…

जगभरातील महत्वाचे नेते राजघाटावर पोहोचले तेव्हा तिथं भक्तीगीतं लावण्यात आली होती. वैष्णव जन तो तेने कहिए… हे गीतही लावण्यात आलं होतं. यातून एकच संदेश जगभरात जातो तो शांतीचा… महात्मा गांधी यांनी कायम शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. हाच विचार सध्या जगाला पुढे जाण्यासाठी महत्वाचा आहे. गुजरातमधील संत आणि कवी असणारे नरसिंह मेहता यांनी वैष्णव जन तो तेने कहिए… हे काव्य रचलं. पुढे महात्मा गांधी यांच्या आश्रमात प्रार्थनेच्या वेळी हे गीत लावलं जायचं. त्याचा अर्थ सगळ्यांना तोच व्यक्ती चांगला वाटतो जो दुसऱ्या दु:ख समजून घेतो आणि त्याला मदत करेन. पण जेव्हा दुसऱ्याची मदत करेल. तेव्हा त्याच्या मनात कोणताही अभिमान नसेल. त्यामुळे हे काव्य कोणत्याही व्यक्तीला किंवा देशाला लागू होतं. हाच संदेश भारत जगाला देऊ पाहात आहे.