ताजमहाल की तेजोमहाल हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हिंदू समर्थकांकडून सातत्याने ताजमहालमध्ये जलाभिषेक करण्याची मागणी केली जात आहे. याआधीही महाशिवरात्रीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्याची मागणी करण्यात आली होती. 26 एप्रिल 2024 रोजी यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्यावेळी ASI ला अंतर्गत नोटीस पाठवली होती. मात्र, ASI ने त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली आहे. युवा ब्रिगेडचे कुंवर अजय तोमर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
योगी युवा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि याचिकाकर्ते कुंवर अजय तोमर यांनी ‘श्रावण महिना हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. भगवान शंकराच्या उपासनेचा हा सण आहे. तेजोमहालय (ताजमहाल) हे भगवान शिवाचे मंदिर आहे. त्यामुळे येथे जलाभिषेक आणि दुधाभिषेक करण्यात यावा. 1212 मध्ये राजा परमादिदेव याने तेजो महालय बांधले होते. त्यानंतर राजा मानसिंग याने तो आपला महाल बनवला. त्यावेलेळी मंदिर सुरक्षित ठेवण्यात आले होते. पुढे मुघलांची सत्ता आली. त्या काळात शाहजहान याने राजा मानसिंगकडून ताजमहाल आणि तेजो महालय ताब्यात घेतले.
ताजमहालमध्ये शाहजहान याची पत्नी मुमताज हिची कबर नाही. 1631 मध्ये मुमताज हिचा मृत्यू झाला. तर, ताजमहालचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झाले. त्यामुळे 1 वर्षानंतर कोणताही मृतदेह पुरता येत नाही. मुमताजची खरी कबर मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये आहे. मुमताजला तापी नदीच्या काठावर दफन करण्यात आले. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. मुघलांनी भारतात येऊन मंदिरे पाडली आणि त्यावर थडगे बांधले असा युक्तिवाद याचिकाकर्ते कुंवर अजय तोमर यांनी केला आहे.
याचिकाकर्ते कुंवर अजय तोमर यांनी जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्याच्या मागणीची याचिका 23 जुलै रोजी दाखल केली आहे. कुंवर अजय तोमर यांच्यावतीने अधिवक्ता शिव आधार सिंह यांनी स्मॉल कॉज कोर्टात ही केस दाखल केली आहे. यामध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर 16 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.