नवी दिल्ली: शिवसेनेने राज्यसभेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेच्या या घोषणेनंतर संभाजी छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतंही सूतोवाच केलं नाही. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेच्या मैदानात (Rajya Sabha Election) अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची शक्यता आहे. संभाजी छत्रपती यांना आता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडूनच पाठिंबा मिळण्याची आशा आहे. तर, संभाजी छत्रपतींना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबतचे सर्व अधिकार भाजप पक्षश्रेष्ठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच भाजपचा पाठिंबा मिळाल्यानंतरही संभाजीराजे जिंकण्यासाठीची अतिरिक्त मते कशी मिळवणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. 15 राज्यातील 57 जागांसाठी भाजप उमेदवार देणार आहे. महाराष्ट्रातील 2 जागांसह तिसरी जागाही भाजप लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं. काल रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या जागेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे संभाजी राजे छत्रपती अपक्ष उभे राहील्यास पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय फडणवीस यांनी घ्यावा, असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा ठोस निर्णय दिल्लीत झाला नाही. ते अधिकार फडणवीसांना दिले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंना भाजप पाठिंबा देणार की पक्षातूनच तिसरा उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशभरातील 57 जागांसाठी येत्या 2 दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
संभाजी छत्रपती यांनी काल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांशी माझं सविस्तर बोलणं झालं आहे. जे ठरलंय त्यानुसार गोष्टी होतील. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा मला विश्वास आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. संभाजीराजेंनी हे भावनिक आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासातच शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित झाल्याचं स्पष्ट करत संजय पवार हेच राज्यसभेवर जाणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संभाजी छत्रपती यांचा पत्ता कट झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेना प्रवेशाला नकार दिला. अपक्ष म्हणून पाठिंबा द्या किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी विनंती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं सांगितलं जातं. मात्र, शिवसेनेकडूनही ही विनंती अमान्य करण्यात आली.