मुंबई | 18 जानेवारी 2024 : दाट धुक्यामुळे सध्या देशात बऱ्याच विमानांचे उड्डाण उशीरा होत आहे. त्यामुळे प्रवशांना तासनतास विमानतळावरच वाट पहावी लागत आहे. त्याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये काही प्रवासी एअरपोर्टच्या रनवेवर बसूनच जेवत होते. आता तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगो एअरलाइ आणि मुंबई विनातळाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
एकीकडे इंडिगो एअरलाइनला 1.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर मुंबई एअरपोर्टलाही 90 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) यांच्या द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोघांनाही कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यापूर्वीच इंडिगोतर्फे या घटनेसाठी एक माफीनामा सादर करण्यात आला होता. दरम्यान इंडिगोला ठोठावण्यात आलेला हा कोट्यवधी रुपयांचा दंड हा एअरलाईनवर लावण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.
फ्लाइटला उशीर झाला होता आणि प्रवासी हे विमानापासून दूर जाण्यास तयार नव्हते.त्यामुळेच त्यांना रनवेवर बसवून जेवण देण्यात आले , असे स्पष्टीकरण इंडिगोतर्फे देण्यात आले होते. त्यानंतर जो व्हिडीओ समोर आला त्यामध्ये कडाक्याच्या थंडीत प्रवासी रनवेवर बसून जेवताना दिसले होते. मात्र इंडिगोचा हा तर्क, माफीनामा डीजीसीए समोर किती टिकाव धरतो, हे तर येत्या काही दिवसांतच कळेल.
स्पाइसजेट आणि एअर इंडियालाही दंड
याशिवाय डीजीसीएने स्पाइसजेट आणि एअर इंडियालाही दंड ठोठावला आहे. दोघांना प्रत्येकी 30 लाख रुपये भरण्यास सांगितले आहे. दिल्लीत धुक्यामुळे त्यांच्या विमानांना उशीर झाला. ते धुक्यासाठी तयार नव्हते, म्हणूनच डीजीसीएने त्यांच्यावर दंड ठोठावला आहे. धुक्याच्या दिवसात CAT III प्रशिक्षित वैमानिकांना ड्युटीवर नियुक्त न केल्याचा या विमान कंपन्यांवर आरोप आहे. अशा वैमानिकांना कमी प्रकाशातही उड्डाण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
दिल्ली एअरपोर्टवर थप्पड कांड
दाट धुक्यामुळे सोमवारी दिल्ली विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला. गोव्याला जाणारे इंडिगो विमान काही तास उशिराने निघाले. यावेळी एका प्रवाशाचा संयम सुटला आणि त्याने पायलटला धक्काबुक्की केली. यादरम्यान तो पायलटला म्हणाला, ‘तुला विमान उडवायचे असेल तर कर, नाहीतर खाली तरी उतरवा.’ या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. तो हनिमूनसाठी पत्नीसह गोव्याला जात होता. मात्र त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आता त्याला नो-फ्लाइटच्या लिस्टमध्ये टाकण्याची तयारी सुरू आहे.