महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही कोर्टातून सुटलेला नाही. उद्धव ठाकरे गट यांनी शिंदे गटाच्या तर शरद पवार गटाने अजितदादा गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर युक्तिवादही झाला आहे. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. शिवाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊन निर्णय होणार का? न्यायामूर्ती चंद्रचूड जाता जाता ऐतिहासिक निकाल देणार का? निकाल दिल्यास फुटलेल्या गटाचे आमदार राहणार की जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. या प्रकरणावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोर्टात 313 क्रमांकावर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, हे प्रकरण 313 प्रकरणावर असल्याने सुनावणी होण्याची शक्यताच असल्याचं म्हटलं आजत आहे. त्या दिवशी आयकर विभागाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर पुढची तारीख पडली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
आमदार अपात्रता प्रकरणावर तारखेवर तारखा पडत होत्या. आधी 18 सप्टेंबरची तारीख सुनावणीसाठी ठरली होती. त्यानंतर सुनावणीची तारीख 22 ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवाय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर सुप्रीम कोर्टात मंगळवार 24 सप्टेंबरची तारीख पडली आहे. पण मंगळवारी दुसरी एक मोठी सुनावणी असल्याने या प्रकरणाची सुनावणी अधांतरी लटकण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वीच चंद्रचूड हे ऐतिहासिक निकाल देणार का? याचं सर्वांनाच कुतुहूल लागलं आहे. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निकाल आले आहेत. मात्र ठाकरे गटाचं प्रकरण अत्यंत क्लिष्ट असल्याने या प्रकरणावरील निकाल माईलस्टोन ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चंद्रचूड हे पदावर असतानाच निकाल येणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालाप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षाची सुनावणीही कोर्टात प्रलंबित आहे. वारंवार सुनावणी लांबणीवर पडत असल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या प्रस्तावित इमारतीचं 23 सप्टेंबरला भूमीपूजन होणार आहे. भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश 23 सप्टेंबरला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उच्च न्यायालयाची नवी इमारत उभी राहत आहे. विशेष बाब म्हणजे 24 सप्टेंबरला आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीची तारीख आहे. त्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश एकाच मंचावर येणार आहेत.