पत्नीसह सासरकडील छळामुळे AI अभियंता अतुल सुभाष याने आत्महत्या केली. देशात छळ, कुत्सित टीका, अंहकार, स्वभाव न जुळणं अशा अनेक कारणांमुळं घटस्फोटाचा स्फोट होत आहे. आजकाल लग्नाचा घट बसतो न बसतो की घटस्फोट व्हायला लागली आहेत, अशी वाक्य हल्ली आपल्या कानावर अधिक यायला लागली आहेत. भारतात घटस्फोटाचे प्रमाण जगापेक्षा कमी आहे. पण त्याचा आलेख उंचावत असल्याने चिंता पण आहे. देशात जवळपास 14 लाख लोक हे घटस्फोटित आहेत. तर 35 लाख पति-पत्नी विभक्त राहत असल्याचा दावा आकडेवारी करते. याचा अर्थ लग्न हा भातुकलीचा खेळ होत चाललाय का?
देशात घटस्फोटाचे वाढतंय का प्रमाण?
स्वातंत्र्यानंतर गेल्या शतकातील 50 व्या वर्षात देशात हिंदू कोड बिल आले. या कायद्याने महिलांना घटस्फोटाचा अधिकार दिला. 1976 मध्ये या कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. परस्परांच्या संमतीने पती-पत्नीला घटस्फोट घेण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिका आणि युरोपातील देशात घटस्फोट हा सामाजिक कलंक नाही. पण भारतात घटस्फोट घेणे, विभक्त राहणे योग्य मानल्या जात नाही. तरीही देशात घटस्फोटाचे प्रमाण कमी न होता वाढत आहेत.
भारतात किती घटस्फोटीत आहेत? असा प्रश्न येतो. 2011 मधील जनगणनेनुसार, देशात त्यावेळी 13.62 लाखांहून अधिक जण घटस्फोटीत होते. एकूण लोकसंख्येत हा आकडा 0.11 टक्के इतका आहे. पुरूषांच्या तुलनेत घटस्फोटीत महिलांची संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यावेळी घटस्फोटीत पुरूषांची संख्या 4.52 लाख होती. तर महिलांचा आकडा हा 9.09 लाखांहून अधिक होता.
अजून एक धक्कादायक प्रकार म्हणजे विभक्त राहणाऱ्यांचे प्रमाण यापेक्षा तिप्पट होते. लग्नानंतरही पती-पत्नी वेग वेगळे राहणाऱ्यांची संख्या 35.35 लाखांहून अधिक होती. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 24 लाख महिला पतीपासून वेगळ्या राहतात. सर्वात धक्कादायक म्हणजे शहरांच्या तुलनेत गावाकडे घटस्फोटितांचा आकडा अधिक आहे. शहरात ही आकडेवारी 5.04 लाख तर गावात 8.58 लाख घटस्फोटीत राहतात. ग्रामीण भागात जवळपास 24 लाख लोक असे आहेत, जे पतीपासून वा पत्नीपासून वेगळे राहतात.
देशात 800 हून अधिक कौटुंबिक न्यायालय
यापूर्वी 2001 मधील जणगणनेच्या आकडेवारीनुसार, देशात 33.31 लाखांहून अधिक घटस्फोटीत होते वा विभक्त राहणारी जोडपी होती. दहाच वर्षात 2011 मध्ये हा आकडा 50 लाखांच्या घरात पोहचला. तर या 14 वर्षांत हा आकडा किती वाढला असेल याची कल्पना येते. आता तर मोबाईल, सोशल मीडियाचा वापर, दोघांचे हुद्दा, पगार यामुळे होणारे वाद आणि विवाहबाह्य संबंध यामुळे ही आकडेवारी अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.
देशात पती-पत्नीत खटके उडाले की सर्वात अगोदर कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येतो. सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात जवळपास 800 पेक्षा अधिक कौटुंबिक न्यायालय आहेत. याच न्यायालयात घटस्फोट, विभक्त होण्याची प्रक्रिया, पोटगी, पती-पत्नीमधील संपत्तीचा वाद, मुलांचा ताबा याविषयीची प्रकरण सुरू असतात.
आकडेवारीवर नजर टाकल्यास, कौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 2023 च्या अखेरीस कौटुंबिक न्यायालयात जवळपास 11.50 लाखांपेक्षा अधिक प्रलंबित प्रकरणं आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने कुटुंब न्यायालयातील प्रकरणांबाबत माहिती सादर केली होती. त्यानुसार, 2023 मध्ये देशभरातील कौटुंबिक न्यायालयातील 8.26 लाख प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. म्हणजे प्रत्येक दिवशी 2,265 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर त्यापूर्वीच्या वर्षात 2022 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने 7.44 प्रकरणात निकाल दिला होता.
देशातील 70 टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात वास्तव्य करते. ग्रामीण भागात घटस्फोट, विभक्त राहणे या सारख्या बाबी सामाजिक परीघात बसत नाहीत. त्याकडे वाईट नजरेने पाहीले जाते. कधी कधी विचार, स्वभाव जुळत नसला तरी पती-पत्नी समाज काय म्हणेल या भीतीने एकाच छताखाली मन मारून राहतात. तर काही जण त्यातून सूर जुळवण्याचा प्रयत्न करतात.
पण देशात लग्न व्यवस्थेला हादरे बसत आहेत. ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’, या वृत्तीनं अनेक जण फसलेल्या नात्यात अजून फसू इच्छित नाहीत. तडजोड होण्याची चिन्हं नसली तर पती-पत्नी विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारतात. काही जण दुसरा साथीदार शोधतात. तर काही जण या धक्क्यातून सावरत नाहीत. ते हा कटू अनुभव पुन्हा न घेण्याचा निर्णय घेऊन एकला चलोचा प्रयोग आयुष्यभर राबवतात.
या देशात लग्नाचे स्वप्न क्षणभंगुर
एकूण लोकसंख्येच्या मानाने आणि सामाजिक भीती, एकमेकांना अजून समजून घेण्याची, सहन करण्याच्या वृत्तीमुळे देशात घटस्फोटांचे प्रमाण इतर देशांपेक्षा कमी आहे. भारतात घटस्फोटाचा दर सुदैवाने 1 टक्क्यांपेक्षा पण कमी आहे. इतर देशात तर जीवनभर आणा-भाका घेतल्यानंतरही लग्नाचे स्वप्न क्षणभंगुर आहे. घटस्फोटाचे सर्वाधिक प्रमाण पोर्तुगाल या देशात असल्याचा दावा जागतिक बँक आणि OECD ने केला आहे. केवळ पोर्तुगालच नाही तर संपूर्ण युरोपातच घटस्फोटाचा ट्रेंड आहे. अमेरिका हा घटस्फोटाच्या प्रकरणात जगात 19 व्या क्रमांकावर आहे. या सर्वात प्रगत देशात घटस्फोटाचे प्रमाण 45 टक्के इतके आहे. पोर्तुगालनंतर स्पेन 86 टक्के, सर्वात श्रीमंत आणि आधुनिक लेक्झमबर्ग 80 टक्के, तर सध्या एकमेकांविरुद्ध लढत असलेले रशिया 74 टक्के, युक्रेन 71 टक्के, त्यानंतर बेल्जियम, डेनमार्क, स्वीडन, फिनलँड आणि इतर अनेक देशांचा या यादीत समावेश आहे.
देशात घटस्फोटासाठी कायदे
हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध यांच्यासाठी देशात हिंदू विवाह कायदा लागू होतो. हिंदू विवाह कायद्यातील कलम 13 मध्ये घटस्फोटाची तरतूद करण्यात आली आहे. अर्थात गेले नी घटस्फोट घेतला असं होत नाही. हिंदू विवाह कायद्यातील कलम 13B मध्ये दोघांच्या सहमती, संमतीने घटस्फोटाचा उल्लेख आहे. पण त्यासाठी लग्नाला कमीत कमी एक वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. कौटुंबिक न्यायालयात अर्ज केल्यानंतर दोघांनाही कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येतो. त्यात दोघांनी एकत्र राहण्याचा विचार करणे आवश्यक असते. या सहा महिन्यातही दोघे एकत्र राहण्याविषयी सहमत नसतील तर मग या कायद्यान्वये दोघांना स्वतंत्र होण्याचा अधिकार मिळतो.
जर दोघे कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहण्यास तयार नसतील. त्यांना एकमेकांचा सहवास नकोच असेल, तशी परिस्थिती असेल तर आता सहा महिन्यांचा हा कालावधी पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार कमी झाला आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी लग्न आणि घटस्फोटासाठी पर्सनल लॉ आहे. त्यांचा स्वत:चा कायदा आहे.
पती-पत्नीची व्यस्तता
जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. पती-पत्नी नोकरी करणारे असतील तर त्यांच्यात संवाद होत नाही. पुरेसा संवाद न झाल्याने गैरसमज वाढतात. दोघेही कार्यालयात असतात. घरी आल्यावर दोघांना ही स्वतःची स्पेस जपावी वाटते. अबोला अथवा नेहमीच्याच वाक्यामुळे गप्पांची मैफल रंगत नाही आणि भावनिक आधार मिळत नाही. एकाच छताखाली दोघे पाहुणे होतात.
सामाजिक बदल
घटस्फोट हा पूर्वी एक कलंक, डाग मानल्या जायचा. लोक काय म्हणतील या भीतीने दोघेही एकमेकांना एका पातळीवर समान धागा पकडून आयुष्य काढत होते. आता सामाजिक विचारात बदल होत आहे. घटस्फोट घेणे सोपे नसले तरी अनेक जण समाज काय म्हणेल याकडे लक्ष न देता वेगळे होण्याचा मार्ग निवडतात.
घुसमटीला रामराम
महिला या आर्थिक, शैक्षणिक स्तरावर झपाट्याने प्रगती करत आहेत. अनेक जणी चांगल्या हु्द्दावर काम करत आहेत. अनुकूल नवरा नसेल. तर काही दिवस निभावून बघायचं, पण घुसमट होत असेल तर अनेक जणी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. नवरा दारुडा, व्यसनी, छंदी-फंदी असेल तर महिला स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत आहेत.
अंहकाराचा वारा
अंहकाराचा वारा न लागो राजसा असं म्हणतात. पती-पत्नी दोघेही अंहकारी आणि मेरी सुनो असे असतील तर मग संसाराची गाडी पुढे धावत नाहीत. तिला दररोज ब्रेक लागतो. समंजसपणा नसेल, संवाद नसेल तर मग अडचण होते. दोघांचा सूर एकमेकांविरोधात असेल तर अशी जोडपी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत.
प्रेमविवाहात वाढ
लग्न, विवाह हा भारतात एक व्यवस्था आहे. हिंदूंमध्ये विवाह हा संस्कार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने लग्न ठरत असे. पण आता अरेंज मॅरेज मागे पडत आहे. प्रेमविवाहाचे दिवस आहे. लग्नपूर्वीचा रोमॅटिंकपणा लग्नानंतर कमी होतो आणि प्रेमविवाहाला तडे जातात.