नवी दिल्लीः राहुल गांधींनी काँग्रेसला उभारी देण्यासाठी एकीकडे भारत जोडोचे आयोजन केले आहे, तर दुसरीकडे पक्षांतर्गत राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) गटाचे आमदार आणि सचिन पायलट गटाचे आमदार आता एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राजस्थानातील आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या ओसियनमधील काँग्रेस आमदार दिव्या मदेरणा (MLA Divya Maderna) यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांचे विश्वासू समजले जाणारे मंत्री शांती धारीवाल आणि महेश जोशी यांच्यावर मात्र आता जोरदार टीका केली आहे.
यावळी दिव्या मदरेणा यांनी राज्यस्थानातील नेत्यांना स्पष्टच सांगितले आहे की, जोशी यांच्या आवाहनावरून आपण यापुढे आता विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दिव्या मदेरणा यांचे वडील महिपाल मदेरणा हे अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यावेळी सीडी घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यामुळे त्यांना पदावरून बडतर्फ केले गेले होते. त्या महिपाल मदरेणा यांचे गेल्या वर्षी निधन झाले.
राजस्थानातील राजकारणाविषयी दिव्या मदेरणा यांनी सांगितले की, जोशी आणि धारीवाल यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची खिल्ली उडवली आहे.
त्यामुळे हा गुन्हा झाला असून तो पूर्णपणे अनुशासनहीन आहे. हे दोन्ही नेते पक्षद्रोही असून त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राजस्थानातील 92 आमदारांच्या राजीनामा नाट्यावर आमदार दिव्या मदेरणा बोलताना म्हणाल्या की, कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास हे खोटं सांगत आहेत.
हा संपूर्ण कट राजकारणातील चार जणांनी रचला असून राजकीय नाट्याची ही पटकथा लिहिली आहे, आणि त्यामध्ये चार जणांचा हात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या राजकीय नाट्याचे दिग्दर्शकही लवकरच सगळ्यांसमोर येतील असंही त्यांनी सांगितले.
जोधपूरच्या जालीवाडा गावातील भंवरी देवी नावाची एक महिला एका उपकेंद्रात सहाय्यक परिचारिका म्हणून कार्यरत होती. मात्र सप्टेंबर 2011 मध्ये त्या बेपत्ता झाल्या होत्या.
त्यानंतर भंवरीचे पती अमरचंद यांनी महिपाल मदेरणा यांच्या सांगण्यावरून पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. महिपाल हे त्यावेळी काँग्रेस सरकारमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री होते. नंतर खुद्द अमरचंदही या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले.