चंदिगढ, पंजाब सरकारने (Panjab Government) दिवाळीत फटाके (Crackers) फोडण्याची वेळ निश्चित केली आहे. पंजाबच्या भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने दिवाळीच्या रात्री फक्त 2 तासच फटाके फोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंजाबचे मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांनी दिवाळीच्या रात्री 8 ते 10 या दोन तासांसाठीच फटाके वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये आता दिवाळीची आतिषबाजी फक्त दोनच तास होणार आहे.
पंजाब सरकारने राज्यात फक्त ग्रीन फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे. याबाबत पंजाब सरकारच्या पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.
यासोबतच दिवाळी व्यतिरिक्त श्रीगुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्व दिवशी सकाळी 4 ते 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत एक तास फटाके वाजवण्याची परवानगी असेल.
त्याचबरोबर नाताळच्या निमित्ताने 25-26 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 ते 12.30 असे 35 मिनिटे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत रात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत 35 मिनिटे फटाके फोडता येणार आहे.
पंजाबमध्ये फटाक्यांची निर्मिती, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी आहे. राज्यात केवळ बेरियम क्षार किंवा अँटीमोनी, लिथियम, पारा आर्सेनिक, स्ट्रॉन्शिअम, क्रोमेट या संयुगांपासून तयार न केलेले हिरवे फटाके विकले जातील. फटाक्यांची विक्री केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच केली जाणार असून परवानाधारक व्यापाऱ्यांनी हिरव्या फटाक्यांव्यतिरिक्त विषारी रसायनयुक्त फटाके विकले जाणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल.