देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रथा आणि परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जात आहे. देशात दिवाळीबाबतच्या अनेक हटके प्रथाही पाळल्या जातात. एका गावात तर दिवाळीच साजरी केली जात नाही. तर देशातील एक असंही गाव आहे, तिथं दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ‘मौत का खेल’ रंगतो. उज्जैनच्या बडनगर तालुक्यातील भिडावद गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. ही परंपरा पाहून लोकांचा थरकाप उडतो. अंगावर रोमांच येतात. अन् पोटात भीतीचा गोळा येतो. या गावातील लोक जमिनीवर झोपतात आणि त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. हे चित्र संपूर्ण बघत असतो. परंपरेनुसार लोकांना असं वाटतं की, असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेच्या दिवशी ही परंपरा निभावली जाते.
गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखाली आल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. आस्थेच्या नावाखाली इथे लोकांच्या जीवाशी खेळले जाते. या समारंभात सहभागी होण्यासाठी लोकांना परंपरेनुसार पाच दिवस उपवास करावा लागतो.
#WATCH | Madhya Pradesh: In a unique tradition in the village of Bhidadwad in the Ujjain district, devotees allow cows to walk over them. The tradition is observed on Govardhan Puja, the second day of Diwali. pic.twitter.com/sHFDr2TKNL
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) November 2, 2024
मोठी मिरवणूक
ही परंपरा कधी सुरू झाली कुणालाच माहीत नाही. पण गावातील बुजुर्ग असोत की तरुण… सर्वच जण ही परंपरा आणि प्रथा पाहूनच मोठे झाले आहेत. ही प्रथा आणि परंपरा पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या गावातील लोक येतात. इतर राज्यातील लोकही या गावाकडे येत असतात. ज्यांना आपला नवस करायचा असतो त्यांना दिवाळीच्या पाच दिवस आधी घर सोडावं लागतं. माता भवानीच्या मंदिरात येऊन हे लोक राहतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी एक मोठी जत्रा भरते.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला सकाळी पूजा होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातून मोठी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर ज्यांचे नवस असतात ते लोक जमिनीवर झोपतात. त्यानंतर त्यांच्या अंगावरून गायी पळवल्या जातात. असं केल्याने देवी आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने आपला नवस पूर्ण होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील असं या लोकांना वाटतं. या अनोख्या परंपरेत आता पंचक्रोशीतील लोकही सामील होताना दिसत आहेत. त्यांनाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायच्या असतात. काहींना घर बांधायचं असतं, तर काहींचं लग्न जुळत नाही, काहींना मुल होत नाही तर काहींच्या हातात पैसा टिकत नाही. तर काहींना कामधंदा हवा असतो, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी लोक नवस करतात आणि या अग्निदिव्याला सामोरेही जातात.