नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार आहे. या अधिवेशनापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत अनपेक्षित असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका निमंत्रण पत्रिकेवरून हा ड्रामा घडला. डीएमकेच्या खासदाराने या पत्रिकेवरून संताप व्यक्त केला. त्यामुळे सर्वच जण आवाक झाले. त्यानंतर या खासदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समजूत काढल्यानंतर हा खासदार शांत झाला. सर्व पक्षीय बैठकीत असं काय घडलं? काय होतं त्या पत्रिकेत की ज्यामुळे खासदाराने पत्रिकाच फाडावी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. आज होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती. या बैठकीला डीएमकेचे खासदार त्रिची शिवाही उपस्थित होते. यावेळी नवीन संसदेत झालेल्या ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायाला मिळाला. डीएमके खासदार त्रिची शिवा यांनी भर बैठकीतच ही निमंत्रण पत्रिका फाडली. हिंदी भाषेतून निमंत्रण पत्रिका असल्याने डीएमकेने संताप व्यक्त केला. सरकार हिंदी भाषा थोपवत असल्याचा आरोप करत शिवा यांनी ही पत्रिका फाडली.
इंग्रजी भाषेमधून निमंत्रण पत्रिका का दिली नाही? हिंदी भाषेतील पत्रिका का दिली? असा सवाल खासदार शिवा यांनी बैठकीत केला. शिवा अत्यंत संतापले होते. त्यांचा हा संताप पाहून इतर खासदारही अवाक झाले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे शिवा हे शांत झाले.
आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता संसद परिसरात संबोधित करतील. त्यानंतर 11 वाजल्यापासून लोकसभेत आणि राज्यसभेत गेल्या 75 वर्षातील संसदीय कामकाजाबाबत चर्चा होईल. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेत पीयूष गोयल संबोधित करणार आहेत.
तर उद्या सकाळी 9.30 वाजता जुन्या संसद परिसरात राज्यसभा आणि लोकसभा खासदारांचे फोटोसेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही फोटोसेशनला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात सर्व खासदार जातील.
नवीन संसद भवनात उद्या पहिली बैठक होणार आहे. बुधवारपासून नियमितपणे नव्या संसदेमध्ये कामकाज सुरू होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशन काळातच हे शिफ्टिंग होणार आहे. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.