नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. उत्तर प्रदेशमधील शेतकरी असलेले चौधरी चरण सिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. आजोबा चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत त्यांचे जयंत चौधरी उभे राहिले. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरून या नेत्यामध्ये खडाजंगी झाली.
उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय लोक दलचे प्रमुख जयंत चौधरी आणि समजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची अनेक वर्ष युती आहे. भाजप विरोधात नव्याने निर्माण झालेल्या इंडिया आघाडीमध्ये अखिलेश यादव सामील झाले. त्यामुळे जयंत चौधरी हे सुद्धा इंडिया आघाडीत सामील होणार अशी अटकळ बांधली जात होती. पण, जयंत चौधरी यांनी अनपेक्षितपणे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
जयंत चौधरी हे भाजपसोबत जाण्यामागे त्यांचे आजोबा चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे हे कारण आहे. आजोबांना भारतरत्न मिळाल्याबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले. राज्यसभेत चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावर भाषण करण्यासाठी जयंत चौधरी उभे राहिले. तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्याला आक्षेप घेतला.
जयंत चौधरी यांनी राज्यसभेत ‘भारतरत्न यांचा का अपमान होत आहे? त्यांना का डावलले जात आहे? हा निवडणुक संबंधित निर्णय नाही. तो कायमचा आहे. चौधरी चरणसिंग यांना काहीही मिळाले नाही तरीही त्यांच्या मृत्यूच्या ३७ वर्षानंतरही त्यांचे नाव जिवंत आहे. चौधरी चरणसिंग आपल्यातच आहेत असे ते म्हणाले. त्यावर खर्गे यांनी कोणत्या नियमाने त्यांना बोलू दिले, असा सवाल करत सौदेबाजीचा आरोप केला.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी यावर ‘ही भाषा वापरू नका. चौधरी चरणसिंग यांचा अपमान मी सहन करणार नाही. त्यांचे सार्वजनिक जीवन निष्कलंक आहे. त्यांची सचोटी व बांधिलकी शेतकऱ्यांप्रती कायम होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, अशा शब्दात खर्गे यांना गप्प केले.
राज्यसभेतील या प्रकारानंतर जयंत चौधरी यांना पत्रकारांनी एनडीएमध्ये येण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ‘आता मी नकार कसा देऊ? असे म्हणत भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. राज्यसभेतील प्रकारामुळे मी अस्वस्थ झालो. याचा निवडणुकीशी संबंध नाही. एका खासदाराच्या अधिकारांची पायमल्ली झाली, पण सभापतींनी माझ्या अधिकारांचे रक्षण केले. आयुष्यात मी कधीही कोणाकडे हात पसरला नाही असे सांगितले.
यावेळी पत्रकारांनी जयंत चौधरी यांना त्यांच्या एका जुन्या विधानाची आठवण करून दिली. ‘मै चवन्नी नहीं हूं कि पलट जाऊं’ असे विधान 2022 मध्ये जयंत चौधरी यांनी केले होते. याच विधानावरून आता विरोधक त्यांची खिल्ली उडवत आहेत. यावर ते म्हणाले, ‘या सर्व क्षुल्लक गोष्टी आहेत. मी हे सर्व सहन करायला तयार आहे. मला माझ्या लोकांच्या कल्याणाची काळजी घ्यावी लागेल. 2022 मध्ये म्हटले होते की मी चवन्नी नाही. पण, ती सगळी निवडणुकीची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी विरोधक जे काही बोलतात ते लोक विसरतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला.